मोठी बातमी: ठाकरे, पवार थेट डोंबिवलीत.. शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक
डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात एका महिला डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी, विष्णुनगर पोलिसांनी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

डोंबिवली: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 195/26 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132 आणि 121(1) अन्वये दाखल गुन्ह्यात रमेश म्हात्रे यांना अटक केली आहे. याशिवाय मारहाण करणाऱ्या इतर 3 जणांना देखील आधीच अटक करण्यात आली असून कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाकरे आणि पवारांचा थेट डोंबिवली दौरा
दरम्यान, मारहाणीच्या या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने राज्यभरात मोठे पडसाद उमटले होते. दुसरीकडे याच प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. तर त्यानंतर काही वेळातच आदित्य ठाकरेंनी थेट डोंबिवलीत जाऊन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची विचारपूस केली होती. तसेच रमेश म्हात्रेंवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
आदित्य ठाकरेंशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट दिली होती. तसंच मारहाण झालेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून नेमकी घटना काय घडली ते समजून घेतलं होतं.
नेमकं काय घडलं होतं?
दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या वादातून नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा आरोप आहे. यावेळी महिला डॉक्टर तसेच इतर काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते.










