'रामाच्या नावावर सत्ता मिळवली, अन् आता…’, रामरक्षा आंदोलनात ठाकरे संतापले!
ठाकरे गटाने अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहारप्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 'रामरक्षा आंदोलन' सुरू केले. या आंदोलनात रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करून निषेध व्यक्त करण्यात आला.
ADVERTISEMENT

मुंबईः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिर परिसरातून रविवारी 'रामरक्षा आंदोलन' करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आयोजित या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करत हिंदुत्व, राम मंदिर आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. आंदोलनाची सुरुवात रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाच्या पठणाने झाली.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
"सत्तेसाठी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या, पण आज प्रभू रामांच्या नावाने आलेल्या देणगीवरच डल्ला मारला जात आहे." रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी श्रद्धेचाही विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.
"राम मंदिर आंदोलनात शिवसैनिकांचं योगदान सर्वाधिक होतं." राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी संघर्ष केला, त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










