लग्नासाठी ठेवलेले पैसे बाप दारु अन् जुगारात उडवेल, संपूर्ण कुटुंब विरोधात एकवटलं अन् मोठं कांड

Crime News : मुलीच्या लग्नाचे पैसे जुगारात उडवण्याच्या भीतीने पत्नी आणि मुलांनीच मिळून वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या तपासात संपूर्ण कट उघड झाला.

Crime News

Crime News

मुंबई तक

22 Apr 2026 (अपडेटेड: 22 Apr 2026, 01:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नासाठी ठेवलेले पैसे बाप दारु अन् जुगारात उडवेल

point

संपूर्ण कुटुंब विरोधात एकवटलं अन् मोठं कांड

Crime News : ब्राह्मणन गावात 14 एप्रिल रोजी 36 वर्षीय हरनारायण प्रजापती यांचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला होता. सुरुवातीला ही घटना बाहेरील कोणाकडून तरी झालेली हत्या असल्याचे भासवण्यात आले. खुद्द हरनारायणच्या कुटुंबीयांनीच पोलिसांत धाव घेत एका शेजाऱ्यावर संशय व्यक्त केला होता आणि तक्रार दाखल केली होती. मृतदेहावरील जखमांच्या खुणा पाहून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला, मात्र तपासाची चक्रे फिरताच धक्कादायक सत्य समोर आले ज्याने पोलिसांनाही चकित केले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून समोर आली आहे.

हे वाचलं का?

व्यसन आणि लग्नाचे पैसे; वादातून रचला मृत्यूचा कट

पोलिस तपासात आणि कुटुंबीयांच्या चौकशीदरम्यान त्यांच्या विधानांमध्ये तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशीत समोर आले की, हरनारायण प्रजापती यांना दारू आणि जुगाराचे  व्यसन होते. त्यांनी अलीकडेच आपल्या मुलीच्या लग्नासाठी गुरे विकून 82,500 रुपये जमा केले होते. हरनारायण हे पैसेही व्यसनापायी उडवून देतील, अशी भीती घरातील सदस्यांना वाटत होती. वारंवार समजावूनही जेव्हा ते ऐकत नव्हते, तेव्हा घरातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले. याच पैशांच्या आणि भविष्यातील चिंतेपोटी पत्नी, तीन मुली, एक अल्पवयीन मुलगा आणि एका ओळखीच्या तरुणाने मिळून हरनारायण यांचा काटा काढण्याचा भयानक कट रचला.

हेही वाचा : काका कामासाठी पुण्यात, तिकडं पुतण्याचं काकीसोबत सूत जुळलं, सगळं उघडं होताच दोघांचा टोकाचा निर्णय

दोरीने गळा आवळून हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

आरोपांनुसार, जेव्हा हरनारायण गाढ झोपेत होते, तेव्हा त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी दोरीने त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. हे प्रकरण केवळ घरगुती भांडणातून झालेली हत्या वाटू नये, म्हणून त्यांनी अत्यंत चलाखीने मृतदेह जवळच्या नाल्यात फेकून दिला. ही घटना अपघाती वाटावी किंवा बाहेरील शत्रूने केली असावी, असा त्यांचा प्रयत्न होता. इतकेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी हरनारायण यांचा मोबाईल फोन तोडला आणि लग्नाचे पैसे लपवून ठेवले. पोलिसांनी तपासाअंती या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्येत वापरलेली दोरी, रोख रक्कम आणि तोडलेला मोबाईल फोन जप्त केला आहे.

या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नात्यातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली रक्कम सुरक्षित ठेवण्याच्या अट्टाहासातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ऑपरेशन ग्रुप आणि टीमने कॉल डिटेल्स आणि लोकेशनचा आधार घेत या गुन्ह्याचा छडा लावला. सध्या सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून, महोबा पोलिसांनी या हत्याकांडाचा यशस्वी उलगडा केला आहे. एका व्यसनाच्या नादाने संपूर्ण हसत्या-खेळत्या कुटुंबाची कशी राखरांगोळी होते, याचे हे एक विदारक उदाहरण ठरले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मातोश्रीवर विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी 4 नेत्यांचं लॉबिंग, पण काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर ठेवली 'ती' अट