Crime News : पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यात सरपंच हरबिंदर संधू यांच्या हत्येने राज्यातील वाढत्या गँगवॉर आणि संघटित गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे. हल्लेखोरांनी या घटनेत कथितपणे एके-सीरिज असॉल्ट रायफल आणि 9 एमएम पिस्तूलाचा वापर केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. जानेवारी महिन्यात वाल्टोहा येथील सरपंच आणि लकी ओबेरॉय यांच्या हत्येनंतरची ही तिसरी मोठी घटना मानली जात आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून आणि न्यायालयीन साक्षीमुळे झाला असल्याची शक्यता आहे. सरपंच हे एका खंडणी प्रकरणात सह-तक्रारदार होते. या गोळीबारात जर्मन सिंग नावाचा व्यक्तीही जखमी झाला आहे. लांडा हरीके गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून, ती त्यांच्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला असल्याचे म्हटले आहे.
सरपंचांच्या हत्येत एके-सीरिज असॉल्ट रायफलचा वापर झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या हल्ल्याची पद्धत 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येशी तुलना केली जात आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. गँगस्टर लांडा हरीकेने व्हायरल पोस्टमध्ये हा केवळ ‘ट्रेलर’ असल्याचा दावा करत अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. दरम्यान, निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून डीएसपी पट्टी जगबीर सिंग आणि एसएचओ सरहाली गुरविंदर सिंग यांना निलंबित करण्यात आले आहे.
पंजाबच्या माझा भागात सध्या सत्ता नौशहरा, लांडा हरीके आणि गुरदेव गहशाल गँग यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची पार्श्वभूमी 2024 मधील एका खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे. सुखविंदर सिंग उर्फ ‘नोनी’ याच्यावर एका व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्या प्रकरणात सरपंच हरबिंदर संधू हे साक्षीदार होते. नंतर नोनीची हत्या करण्यात आली आणि त्याचा बदला घेण्यासाठी सरपंचांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय डॉली बल गँगच्या वाढत्या हालचालींमुळेही परिसरातील तणाव वाढला आहे.
राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कायदा-सुव्यवस्थेवर कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’ हे प्रत्यक्ष कारवाईपेक्षा प्रसिद्धीसाठी असल्यासारखे वाटत असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. गँगस्टर राणा बलाचौरिया हत्या प्रकरण आणि लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. मोहाली येथे एफआयआर दाखल करण्यात झालेल्या विलंबाबाबत एसएसपींना न्यायालयात माफी मागावी लागली.
न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ आकडेवारी सादर करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात ठोस कारवाई आवश्यक आहे. पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 324 एन्काऊंटर झाले असून त्यात 24 गँगस्टर ठार झाले आणि शेकडो जखमी झाले आहेत. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यानच 34 एन्काऊंटर झाल्याचे सांगितले जाते. मात्र, या एन्काऊंटरांवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही प्रश्न उपस्थित करत ‘राज्य प्रायोजित न्यायबाह्य हत्यां’बाबत अहवाल मागवला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश चकमकी या नाकाबंदीवेळी आरोपींकडून गोळीबार झाल्यानंतर किंवा शस्त्र जप्तीवेळी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने घडल्या.
दरम्यान, पुढील दहा महिन्यांत पंजाबमध्ये निवडणुका होणार असल्याने वाढती गँगवॉर आणि हत्या प्रकरणे आम आदमी पक्ष सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. विरोधी पक्षांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधारी पक्षाचे नेतेच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











