DIG harcharan singh bhullar graft case : पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या रोपड रेंजचे डीआयजी हरचरणसिंग भुल्लर यांना सीबीआयने लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. या कारवाईनंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आणि त्यावेळी त्यांच्याकडे सापडलेल्या मालमत्तेमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. सीबीआयच्या टीमला त्यांच्या घरातून तब्बल 7.5 कोटी रुपये रोख, 2.5 किलो सोन्याचे दागिने, रोलेक्स आणि राडो अशा ब्रँडच्या 26 लक्झरी घड्याळ, चार बंदुका, 17 काडतुसे, 108 विदेशी दारूच्या बाटल्या, तसेच मर्सिडीज आणि ऑडी गाड्यांच्या चाव्या सापडल्या. याशिवाय 50 बेनामी मालमत्तांचे कागदपत्र आणि अनेक बँक खात्यांचे पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
स्क्रॅप व्यापाऱ्याकडून 8 लाखांची लाच घेताना जाळ्यात अकडला
सीबीआयने ही कारवाई तेव्हा केली, जेव्हा डीआयजी भुल्लर मोहालीतील आपल्या कार्यालयात स्क्रॅप व्यापाऱ्याकडून 8 लाखांची लाच स्वीकारत होते. फतेहगड जिल्ह्यातील मंडी गोबिंदगढ येथील व्यापारी आकाश बत्ता यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका प्रकरणाची चौकशी थांबवण्यासाठी डीआयजीने दरमहा लाखो रुपये मागितले, असा आरोप त्यांनी केला होता.
तक्रारीची सत्यता तपासण्यासाठी सीबीआयने जाळं टाकलं. तपासात भुल्लर आणि त्यांच्या दलालामधील वॉट्सअॅप कॉल आणि संभाषणाचे पुरावे मिळाले. दहा दिवसांच्या निरीक्षणानंतर सीबीआयने गुरुवारी सापळा लावला आणि व्यापाऱ्याने 8 लाखांपैकी 5 लाख रुपयांची पहिला हप्ता दिल्यानंतर भुल्लर यांना रंगेहात पकडले.
गुरुवारी अटकेनंतर सीबीआयने त्यांना शुक्रवारी चंदीगडमधील विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले, मात्र सीबीआयने त्यांची रिमांड मागितली नाही. भुल्लर यांच्या वकिलाने सांगितले की, "सीबीआयकडे विचारण्यासारखं काहीच उरलेलं नाही, म्हणूनच रिमांड घेतली नाही."
तथापि, सीबीआयने ज्या प्रमाणात संपत्ती जप्त केली आहे, त्यावरून पूर्ण पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीबीआयच्या प्राथमिक अहवालानुसार, भुल्लर यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सुमारे 50 मालमत्तांचे कागदपत्र सापडले आहेत. या मालमत्ता चंदीगड, मोहाली, पटियाला आणि लुधियाना येथे असल्याचं समोर आलं आहे.
डीआयजीच्या निकटवर्तीय दलालाच्या घरातूनही 21 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. तपास संस्थेच्या मते, ही फक्त सुरुवात आहे. डीआयजीच्या भ्रष्टाचाराचं जाळं पंजाबपुरतं मर्यादित नसून देशातील इतर राज्यांपर्यंत पसरलेला असण्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे.
हरचरणसिंग भुल्लर हे 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून जानेवारी 2023 मध्ये त्यांची डीआयजीपदी बढती झाली होती. त्याआधी त्यांनी पंजाबमधील अनेक जिल्ह्यांत एसएसपी म्हणून काम पाहिलं आहे. सीबीआय आता त्यांच्या लॉकरची तपासणी आणि 15 बँक खात्यांची चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
