परभणी हादरली, तरुणी मित्रासोबत गप्पा मारत होती, 6 राक्षस येऊन पकडलं म्हणाले अन् केला सामुहिक अत्याचार

Parbhani Crime : परभणी : तरुणी मित्रासोबत गप्पा मारत होती, 6 राक्षस येऊन पकडलं म्हणाले अन् केला सामुहिक अत्याचार

Mumbai Tak

मुंबई तक

21 Oct 2025 (अपडेटेड: 21 Oct 2025, 08:57 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

परभणीत तरुणीवर सामुहिक अत्याचार

point

पोलिसांकडून 6 जणांना अटक

Parbhani Crime : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान परिसरातील इटोली शिवारात 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक शारीरिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अवघ्या बारा तासांत गुन्ह्याची उकल केली असून सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हे वाचलं का?

मित्रासोबत झाडाखाली गप्पा मारत असताना आले अन्... 

अधिकची माहिती अशी की, 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत इटोली शिवारातील झाडाखाली गप्पा मारत बसली होती. त्याचवेळी काही विकृत प्रवृत्तीच्या तरुणांनी त्या ठिकाणी येऊन या दोघांना पकडले. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने तरुणीवर शारीरिक अत्याचार केला. या दरम्यान आरोपींनी तरुणी आणि तिच्या मित्राकडील पैसे तसेच इतर वस्तू देखील काढून घेतल्या असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ जिंतूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आणि गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपाची दखल घेत विशेष पथक तयार करण्यात आले. स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींचा माग काढला. बारा तासांच्या आत सहा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणात आरोपींनी अत्याचार करताना मोबाइलवर काही चित्रीकरण केल्याची चर्चा परिसरात सुरू असली तरी पोलिसांनी मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या घटनेचा तपास सुरू आहे. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फूटेज आणि घटनास्थळाचा पंचनामा घेऊन सविस्तर चौकशी केली जात आहे. सध्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.”

घटनेमुळे संपूर्ण जिंतूर तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी या विकृत कृत्याचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात अशा घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि जनजागृती मोहिमा राबवाव्यात, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिंतूर पोलिसांकडून सुरू आहे.

ही घटना केवळ एका तरुणीवरील अत्याचार नसून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. प्रशासन आणि पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांवर त्वरित आणि कारवाई करून भयमुक्त वातावरण निर्माण करावं, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? रामराजेंनी स्पष्टच सांगितलं

    follow whatsapp