Suicide Case: आईच्या ओरडण्यामुळे एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, पीडिता मुलाला त्याच्या आईने सतत टीव्ही पाहत असल्याच्या कारणावरून ओरडलं होतं. घरी कोणीच उपस्थित नसताना मुलाने आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी, मुलाची मोठी बहीण शाळेत गेली होती आणि आई कामावर गेली होती. ही घटना उत्तर प्रदेशातील नोएडा येथे घडली आहे.
ADVERTISEMENT
आईच्या ओरडण्यामुळे आत्महत्या...
पोलिसांच्या माहितीनुसार, मृताच्या आईने सांगितलं की त्यांचा 12 वर्षीय मुलगा अमित उर्फ गोलू याला टीव्ही पाहण्याची प्रचंड सवय होती. या कारणावरून त्याची आई त्याला सतत ओरडायची. आपल्या मुलाने चांगलं शिकून इंजीनिअर व्हावं अशी त्याच्या आईची इच्छा होती. मात्र, नेहमी टीव्ही पाहत असल्यामुळे त्याचं अभ्यासात नीट लक्ष लागत नव्हतं. घटनेच्या दिवशी, अमितची आई सकाळी कामावर जाण्यासाठी तयार होत असताना तो टीव्ही पाहत होता. त्यावेळी, त्याची आई त्याला ओरडली आणि नंतर ती कामावर निघून गेली. परंतु, आईच्या ओरडण्यामुळे अमितला खूप वाईट वाटलं आणि त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.
हे ही वाचा: रीलमध्ये सुसाईड सीन दाखवण्यासाठी गेली, पण डाव अंगलट आला; 4 वर्षांच्या चिमुकलीसमोर महिलेचा जीव गेला
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून मृताच्या बहिणीने पोलिसांना फोन करून आपल्या भावाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासानुसार, हे प्रकरण आत्महत्या असल्याचं सांगितलं जात आहे. आता, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
संबंधित घटनेनंतर, नोएडाच्या नंगला चरणदास परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मृताच्या आईचा 5 वर्षांपूर्वी आपल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यामुळे, आईच नोकरी करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करत होती. त्याची मोठी मुलगी मोनी ही नववीत शिकत असून ती हुशार विद्यार्थिनी आहे. अमित उर्फ गोलू देखील एक चांगला विद्यार्थी होता, परंतु त्याला मोबाईल फोन आणि टीव्ही पाहण्याची खूप सवय होती.
ADVERTISEMENT











