Crime News : एका सशस्त्र दलाच्या (CAF) हेड कॉन्स्टेबलची हत्या करुन त्याचा मृतदेह नदीच्या वाळूत गाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्वनाथ केरकेट्टा (52) असे मृत जवानाचे नाव असून, ते छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे कार्यरत होते. 29 जानेवारी रोजी सेंदूर नदीच्या पात्रात त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. ही हत्या या जवानाच्या पत्नीनेच केली असल्याचे उघड झाले आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारांचा खर्च कसा भागवायचा? आर्थिक विवंचनेत अडकलेल्या नवऱ्याने बायकोला सुपारी देऊन संपवलं
बायकोचे परपुरुषाशी प्रेमसंबंध
मृत विश्वनाथ यांची दुसरी पत्नी क्लॉस्टिका हिचे विवेक टोप्पो नावाच्या तरुणाशी फेसबुकवरुन सूत जुळले होते. या दोघांनी 2023 मध्ये गुपचूप लग्नही केले होते. ही बाब जेव्हा विश्वनाथ यांना समजली, तेव्हा त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला कायमचे रस्त्यातून हटवण्यासाठी पत्नी आणि प्रियकराने हत्येचा कट आखला. नियोजित कटानुसार, रजेवर आलेल्या विश्वनाथ यांना प्रियकर विवेकने मेसेज करून सेंदूर नदीच्या काठावर बोलावले. तिथे संधी साधून त्याने विळ्याने विश्वनाथ यांच्या डोक्यावर सपासप वार करुन त्यांची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वाळूत पुरून टाकला.
आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात
गुन्हा केल्यानंतर आरोपी विवेकने मृत जवानाची ओळख पटू नये यासाठी त्यांचा मोबाईल, बॅग आणि खिशातील सामान लंपास केले. धक्कादायक म्हणजे पतीची हत्या झाल्याचे माहित असूनही आरोपी पत्नी क्लॉस्टिका 22 जानेवारी रोजी रायपूरहून सतीसेमर गावात पोहोचली आणि शेजाऱ्यांकडे पतीबद्दल चौकशी करुन नाटक करु लागली. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि संशयावरुन केलेल्या चौकशीत दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. या घटनेत वापरलेले हत्यार आणि जवानाचे साहित्य जप्त करण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा : चांदीचे दागिने घालणे 'या' तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी असते लकी, झटक्यात बनू शकतात श्रीमंत
कर्तव्यदक्ष जवानाचा बळी
आरोपी पत्नी क्लॉस्टिका आणि तिचा प्रियकर विवेक या दोघांवरही भारतीय न्याय संहितेतला कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन सुरु झालेल्या एका अनैतिक प्रेमसंबंधाने अखेर एका कर्तव्यदक्ष जवानाचा बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT











