Crime News : उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये काही दिवसांपूर्वी तीन बहिणींनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. येथील भारत सिटी सोसायटीमधील निशिका, पाखी आणि प्राची या बहिणींनी एकत्र आत्महत्या केली होती. तिघींना कोरियन कल्चरबद्दल खूप प्रेम होतं आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांनी लिहिलेल्या डायरीतही याचा उल्लेख होता. त्यांच्या कुटुंबातील कुरबुरीदेखील त्यांना या डायरीत लिहून ठेवल्या होत्या. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. या घटनेबाबत वेगवेगळ्या अंगाने चर्चादेखील झाल्या. आता या केसमधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, वडिलांनी या तिन्ही मुलींचे अंतिम संस्कार रात्रीच उरकून टाकल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसदेखील अचंब्यात आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, ‘एक दूजे के लिए’ मधून केला होता डेब्यू
कोरियन गेमचं वेड
ही घटना घडली 4 फेब्रुवारी रोजी. एका कोरियन गेमच्या नादात तीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंगचं वेड समाजाला आणि विशेषत: अल्पवयीन मुलांना कोणत्या थरापर्यंत घेऊन जात आहे यावर सबंध देशभर चर्चा झाली. आत्महत्या करण्याआधी त्या तिघींनी लिहिलेली सुसाईड नोटदेखील पोलिसांना सापडली. यामुळे या आत्महत्येमागेचं कारण समजू शकलं. यानंतर त्या मुलीच्या वडिलांवर लाखो रुपयांचं कर्ज असल्याचं, मेहुणीसोबत त्यांनी लग्न केल्याचं आणि मुली घराबाहेरदेखील पडत नसल्याचं समोर आलं. यानंतर आता एक नवी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अंतिम संस्कारासाठी गडबड
बुधवारी (4 फेब्रुवारी) या तिन्ही मुलींचे पोस्ट मार्टम करण्यात आले. यानंतर त्याच रात्री त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील निगम बोध घाट परिसरात हे अंतिम संस्कार करण्यात आले. अंतिम संस्काराचे सर्व विधी वडिलांनीच केले. अंतिम संस्कार इतक्या गडबडीत आणि रात्रीच का करण्यात आले, असा प्रश्न आता विचारला जात आहे. याविषयी पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हे ही वाचा : रीलमध्ये सुसाईड सीन दाखवण्यासाठी गेली, पण डाव अंगलट आला; 4 वर्षांच्या चिमुकलीसमोर महिलेचा जीव गेला
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी सांगितले की, तिन्ही मुलींच्या मृत्यूचं कारण हे डोक्याला गंभीर इजा होणं हे आहे. अंतिम संस्कार इतक्या गडबडीत का केले याबाबत कोणतेही संदिग्ध कारण समोर आलेले नाही. कोरियन गेमच्या नादापायीच मुलींनी शाळा सोडल्याचं वडिलांनी सांगतिलं आहे. मात्र पोलिस तपासात कोरियन गेमविषयी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, मुलींनी लिहिलेल्या डायरीतून काही कारणं समोर आली आहेत. यामध्ये कुटुंबातील वाद आणि त्यांना होणारी मारहाण याचा उल्लेख आहे. पोलिसांना संशय आहे की, मुलींकडून मोबाईल हिसकावून घेणे आणि सोशल मीडिया अकाऊंट डिलिट करणे ही या आत्महत्येमागची कारणं असू शकतात. अजून याबाबत पोलिस तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT











