Chhatrapati Sambhajinagar crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. नाईट ड्यूटी करून घरी परतलेल्या एका मेहुण्याने आपल्या भावजीची लोखंडी पकडीने डोक्यात वार करून हत्या केली, तर पत्नीवरही जीवघेणा हल्ला केला. ही घटना रविवारी (दि.19) सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान उस्मानपुरा परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
या घटनेत संतोष काशिनाथ खाजेकर (वय 38, रा. म्हाडा कॉलनी, गंगापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीचे नाव बळीराम कल्याण जगधने (रा. रांजणगाव शेणपुंजी, एमआयडीसी वाळूज, ह. मु. उस्मानपुरा) असे आहे. या प्रकरणी मृत संतोष यांच्या मुलाने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, या तक्रारीवरून खून आणि जीवघेणा हल्ला या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बळीराम रात्री नाईट ड्यूटीवर गेल्यानंतर त्यांचे मेहुणे संतोष खाजेकर त्यांच्या घरी मुक्कामी गेले होते. पहाटे सुमारे 6:30 वाजता बळीराम ड्यूटीवरून अचानक घरी आले. त्यावेळी संतोष घरात असल्याचे पाहून ते घाबरले आणि टेबलखाली लपले. मात्र, बळीरामने त्यांना पाहताच संतापाने संतोषला बाहेर ओढून घेतलं आणि लोखंडी पकडीने त्यांच्या डोक्यात जोरदार वार केला. घावांमुळे संतोष गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच कोसळले.
इतक्यावर न थांबता, आरोपी बळीरामने आपल्या पत्नीवरही हल्ला केला. रागाच्या भरात त्याने सायकल उचलून तिच्या डोक्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर आरोपीच्या पत्नीने तत्काळ आपल्या मुलाला फोन करून सर्व माहिती दिली. मुलगा घटनास्थळी धावत पोहोचला असता, त्याने वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्वरित पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. संतोष खाजेकर यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून लोखंडी पकड जप्त केली आहे.
प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे की, आरोपी बळीरामला आपल्या घरी मेहुणा आढळल्याने संशय आणि राग अनावर झाला होता, त्यामुळेच त्याने संतापाच्या भरात हा प्रकार घडवून आणला. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
