Gujrat Crime News : गुजरातमधील प्रांतिज तालुक्यात IIFL फायनान्सच्या मॅनेजरच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी लिमला गावाजवळ एका कारमध्ये माणसा शाखेचे ब्रँच मॅनेजर भरत चौधरी यांचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अवघ्या काही तासांत या हत्येचा उलगडा करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, भरत चौधरी 2 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर लिमला गावातून वडवासा येथे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांची कार आढळून आली. या कारमध्ये भरत चौधरी यांचा मृतदेह होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार केल्याच्या खुणा आढळल्या होत्या.
ADVERTISEMENT
हेही वाचा : फ्लाईंग किस, अश्लील हावभाव, दहीहंडीचा उत्सव या थराला का गेला? अविनाश जाधव EXCLUSIVE
मॅनेजरच्या हत्येमागील संपूर्ण कट समोर आला
प्रांतिज पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास पुढे नेला. या तपासादरम्यान भावना उर्फ भावू ठाकोर आणि तिचा प्रियकर योगेश ठाकोर यांची नावे समोर आली. पोलिसांनी भावनाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मॅनेजरच्या हत्येमागील संपूर्ण कट समोर आला. पोलिस तपासात भावना हिने IIFL फायनान्सकडून 1.50 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले. तर तिच्या प्रियकराने याच कंपनीकडून 4.50 लाख रुपये कर्ज घेतले होते. अशा प्रकारे दोघांवर एकूण 6 लाख रुपयांचे कर्ज होते. कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करावी लागू नये आणि गिरवी ठेवलेले सोन्याचे दागिनेही परत मिळावेत, या उद्देशाने दोघांनी भरत चौधरी यांना संपवण्याचा कट रचला.
हेही वाचा : Astrology : सप्टेंबरच्या 'या' तारखेपासून काही राशींचे नशीब फळफळणार
कारच्या आतच भरत चौधरी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला
या कटानुसार भावनाने भरत चौधरी यांना फोन करून पैसे देण्याच्या बहाण्याने प्रांतिज येथे बोलावले. त्यानंतर योगेश मॅनेजरला माणसाहून आपल्या कारमधून घेऊन निघाला. कार वडवासा परिसरात पोहोचल्यानंतर योगेशने कारच्या आतच भरत चौधरी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गळ्यावर करण्यात आलेल्या गंभीर वारांमुळे भरत चौधरी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मृतदेह आणि कार एखाद्या सुनसान ठिकाणी नेऊन टाकण्याची योजना आखली. हत्या केल्यानंतर ते मृतदेह आणि कार घेऊन लिमलाच्या दिशेने निघाले. मात्र, कार रिव्हर्स करत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात कार अडकली. कार बाहेर काढण्यासाठी बराच प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही.
कार खड्ड्यातून बाहेर निघत नसल्याने दोघांनाही पोलिसांच्या हाती लागण्याची भीती वाटू लागली. अखेर त्यांनी मृतदेह आणि कार घटनास्थळीच सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांना याच कारमधून भरत चौधरी यांचा मृतदेह सापडला. पोलिसांच्या माहितीनुसार, भावना आणि योगेश गेल्या सुमारे सात वर्षांपासून प्रेमी-प्रेमिका आहेत. सध्या भावना उर्फ भावू ठाकोर हिला अटक करण्यात आली आहे. तर योगेश ठाकोर फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून त्याचा शोध सुरू केला आहे.
ADVERTISEMENT












