IPS Y. Puran Kumar Suicide Case : हरियाणातील कर्तव्यनिष्ठ, परंतु सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले पोलिस अधिकारी आयपीएस वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. 2001 च्या बॅचचे हे आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार कधीच सत्तेसमोर झुकले नाहीत. ते भ्रष्टाचार, प्रशासनातील विसंगती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारांविरोधात नेहमीच आवाज उठवताना पाहायला मिळायचे. मात्र, 7 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी चंदीगडमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
कोण होते वाय. पूरन कुमार?
वाय. पूरन कुमार हे हरियाणा कॅडरमधील 2001 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. कठोर, निडर आणि प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आयजीपी (रोहतक रेंज), आयजीपी (कायदा आणि सुव्यवस्था), आयजी (दूरसंचार) तसेच शेवटचे पद – आयजी, पोलिस प्रशिक्षण केंद्र (PTC) सुनारिया, रोहतक अशी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 2025 च्या मध्यात सरकारने त्यांचा बदली आदेश काढत त्यांना रोहतक रेंजवरून सुनारिया येथे हलवले होते. हाच त्यांचा अखेरचा कार्यकाळ ठरला.
चंदीगडमधील सेक्टर 11 येथील त्यांच्या सरकारी निवासातून 7 ऑक्टोबरच्या सकाळी गोळीबाराचा आवाज आला. पोलिसांनी आत प्रवेश केल्यावर वाय. पूरन कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली होती. घटना घडली त्यावेळी त्यांची पत्नी आयएएस अधिकारी अमनीत कौर या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौर्यावर होत्या. घटनेनंतर चंदीगडचे आयजी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला. सध्या चंदीगड पोलिसच या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पूरन कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दीर्घकाळ तणावाचे वातावरण होते. अनेकदा त्यांनी स्वतःला “सिस्टिमचा बळी” असे म्हटले होते.
वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द
पूरन कुमार हे प्रशासनातील भेदभाव, मनमानी आणि बेकायदेशीर आदेशांविरोधात खुलेपणाने बोलणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
जुलै 2020 मध्ये त्यांनी तत्कालीन डीजीपी मनोज यादव यांच्यावर आरोप केला की, जातीय भेदभाव आणि वैयक्तिक रागामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना वारंवार त्यांच्या कॅडरबाहेरील पदांवर बदली केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव अरोरा यांच्यावरही पक्षपाती चौकशी अहवाल तयार केल्याचा आरोप केला आणि स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली.
हरियाणा सरकारने वित्त विभागाची परवानगी न घेता पोलिस विभागात नवीन पदनिर्मिती केली होती; या निर्णयालाही त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. एका अधिकाऱ्याला दोन सरकारी निवास देणे नियमबाह्य असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
प्रशासनिक छळ आणि मानसिक ताण
पूरन कुमार यांनी वारंवार सांगितले होते की, त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे आणि त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांना कट रचल्याची भीती वाटत होती आणि स्वतःच्या सुरक्षेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती. हरियाणाचे डीजीपी यांना त्यांच्या सुरक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेशही दिले गेले होते. या सर्वामुळे ते मानसिकदृष्ट्या तणावाखाली असल्याचे स्पष्ट होते.
अधिकाऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणं
पूरन कुमार हे पहिले अधिकारी नाहीत ज्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला. याआधीही अनेक नामांकित आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
महाराष्ट्राचे ‘सुपरकॉप’ म्हणून प्रसिद्ध हिमांशू रॉय (IPS, 1988 बॅच) यांनी 2018 मध्ये कर्करोग आणि नैराश्यामुळे आत्महत्या केली.
उत्तर प्रदेशचे राजेश साहनी (IPS, एडीशनल एसपी, ATS) यांनी 2018 मध्ये आपल्या कार्यालयात आत्महत्या केली.
तमिळनाडूचे सी. विजयकुमार (IPS, 2009 बॅच) यांनी 2023 मध्ये डिप्रेशन आणि OCD मुळे आत्महत्या केली.
यूपीचे सुरेंद्र कुमार दास (IPS, 2014 बॅच) यांनी कौटुंबिक समस्यांमुळे औषधांचे ओव्हरडोस घेऊन प्राण दिले.
IAS अधिकाऱ्यांमध्येही असे प्रकार दिसले आहेत.
कर्नाटकचे डी. के. रवी (IAS, 2009 बॅच) यांनी 2015 मध्ये आत्महत्या केली. ते भ्रष्टाचारविरोधी कारवाईसाठी ओळखले जात.
नागार्जुन गौडा (कर्नाटक IAS) आणि सुशील कुमार (उत्तर प्रदेश IAS) यांनीही प्रशासनिक दबाव आणि नैराश्यामुळे आत्महत्या केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
