jamnagar 26 month old murder case : जामनगरमध्ये 26 महिन्यांपूर्वी घडलेल्या एका हत्याकांडाच्या तपासात पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही हत्या अचानक घडलेली नसून तिचा संपूर्ण कट आधीच आखण्यात आला होता. मृत जिग्नेश याला नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न दाखवत एका कारखान्यात बोलावण्यात आले आणि तेथेच त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 2 महिने फोन बंद, टेन्शननं अॅडमिट, अभिजित दिल्लीत; आई-वडिलांनी कसे काढले दिवस?
कारखाना केवळ मर्डर करुन पुरण्यासाठी भाड्याने घेतला
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड निलेश यांनी मिळून जिग्नेशला नव्या व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवले. त्यासाठी जामनगरमधील दरेड परिसरात एक कारखाना भाड्याने घेण्यात आला होता. पोलिसांचा दावा आहे की, हा कारखाना केवळ गुन्हा घडवून आणण्यासाठीच आधीपासून तयार ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : 50 वर्षीय कोमलला कात्रीने भोसकले, नवरा फरार, मुलाने शेवटी काय केलं?
दारू पार्टीच्या बहाण्याने बोलावून केला मर्डर
पोलिस तपासानुसार, हत्या होण्याच्या तब्बल तीन दिवस आधीच कारखान्याच्या परिसरात सुमारे 13 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. पोलिसांच्या मते, हा खड्डा मृतदेह लपवण्यासाठीच आधीपासून तयार करण्यात आला होता, त्यामुळे संपूर्ण कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. 31 मेच्या रात्री जिग्नेशला दारू पार्टीच्या बहाण्याने कारखान्यात बोलावण्यात आले. तेथे त्याला सायनाइड मिसळलेली दारू पाजण्यात आली आणि त्यातून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी आधीच तयार केलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरून टाकला आणि कारखाना रिकामा करून घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हत्येनंतर जवळपास दोन वर्षे मृताच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जिग्नेशची पत्नी सातत्याने कुटुंबीयांना तो ऑस्ट्रेलियामध्ये असून तेथे काम करत असल्याचे सांगत राहिली. मात्र, कालांतराने कुटुंबीयांना या स्टोरीबाबत संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे पुन्हा तपासाची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दरेड परिसरातील संशयित ठिकाणी उत्खनन केले. या उत्खननादरम्यान मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले आणि त्यानंतर तपासाला वेगळी दिशा मिळाली. पोलिसांनी मृताची पत्नी, तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या एका मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत हत्येच्या संपूर्ण कटाचा उलगडा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
सध्या पोलिस हत्या करण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप असलेले सायनाइड नेमके कुठून आणण्यात आले, याचाही तपास करत आहेत. तसेच या कटात या तिघांव्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे. जामनगरचे डीवायएसपी पीयूष वांदा यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून प्रत्येक पैलूची बारकाईने चौकशी केली जात आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्या झाल्यानंतर तब्बल दोन वर्षे खोटी कथा सांगून सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
ADVERTISEMENT












