फार्महाऊसवर नेऊन सामुहिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप, माजी आमदारासह दोघांवर गुन्हा दाखल

मिथिलेश गुप्ता

17 Sep 2026 (अपडेटेड: 17 Sep 2026, 12:26 PM)

Kalyan Crime News : भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, मदतीच्या बहाण्याने तरुणीला कार्यालयात बोलावले, बापगावच्या फार्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप

Kalyan Crime News

Kalyan Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कल्याण : फार्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप

point

माजी आमदारासह दोघांवर गुन्हा दाखल

कल्याण : "भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह दोघांनी मदतीच्या बहाण्याने कार्यालयात बोलावले. त्यानंतर भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील फार्महाऊसवर नेऊन सामुहिक अत्याचार केला", असा आरोप एका 22 वर्षीय तरुणीने केलाय. या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? समजून घेऊयात... 

हे वाचलं का?

शस्त्राचा धाक दाखवून दारु पाजली अन् केले अत्याचार 

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पतीसोबत वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने नरेंद्र पवार यांनी तिला आपल्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील फार्महाऊसवर नेले. तेथे शस्त्राचा धाक दाखवून तिला दारू पाजण्यात आली आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

हेही वाचा : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; सरकारला 90 दिवसांची मुदत, 'त्या' 5 मुद्द्यांवर सरकारकडून आश्वासन

पीडितेच्या म्हणण्यानुसार, रात्री सुमारे दोन वाजता नरेंद्र पवार तेथून निघून गेले. त्यानंतर शैलेश पाटील यानेही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पहाटे सुमारे चार वाजता शैलेश पाटील यांच्या घरातील केअरटेकरने पीडितेला तिच्या घरी आणून सोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडितेने काँग्रेस नगरसेविकेकडे मागितली मदत

घटनेनंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने 16 सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका आणि गटनेत्या कांचन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. पीडितेने कथित घटनेशी संबंधित व्हिडीओ तसेच मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅटही दाखविल्याचे कांचन कुलकर्णी यांनी सांगितले. यानंतर कांचन कुलकर्णी या पीडित तरुणीला सोबत घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. कांचन कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याशीही रात्री संपर्क साधला. त्यानंतर पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिर यांनी प्रकरणाची खातरजमा केल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, पीडित तरुणीने पोलिसांकडे न्यायाची मागणी करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या दोघांनी आणखी किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असेल, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी तिने केली आहे.

काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनीही दोन्ही आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. 48 तासांत आरोपींना अटक न झाल्यास हजारो महिलांना सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू आहे.