Lonavala Murder Case, कृष्णा पांचाळ : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात 32 वर्षीय नातवाची आजोबांनीच गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता भुशी परिसरातील मोतीराम हॉटेलमध्ये घडली. पोलिसांच्या तक्रारीनुसार, 83 वर्षीय मोतीराम रावजी मराठे यांनी परवानाधारक रायफलमधून त्यांचा नातू अभय मराठे याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात अभय याचा मृत्यू झाला. घटना समोर आल्यानंतर लोणावळा परिसरात या प्रकरणाची चर्चा झाली असून लोणावळा शहर पोलिसांनी तपास सुरू केला.
ADVERTISEMENT
कुटुंबातील इतर सदस्यांनी आरोपी आजोबांना साथ दिली?
पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेनंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी आरोपी आजोबांना साथ दिल्याचा आरोप आहे. घटनेचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर काढून लपवण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तसेच अभयचा मृत्यू रायफलची साफसफाई करताना अचानक गोळी सुटल्याने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली, ते हॉटेल याच कुटुंबाचे असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा : प्रियकराने हात पकडले तर पत्नीने पाय.., पतीला गळा आवळून संपवलं, नेमकं काय घडलं?
संपूर्ण घटनाक्रमाबाबत पोलिसांना संशय
मात्र, या संपूर्ण घटनाक्रमाबाबत पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांसमोर काही महत्त्वाचे धागेदोरे आले आणि त्यातून या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात 83 वर्षीय मोतीराम रावजी मराठे यांच्यासह हिरामण मोतीराम मराठे, मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्यासह आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आजोबा आणि नातवामध्ये नेमके काय घडले होते, तसेच या हत्येमागील कारण काय होते, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर पुरावे लपवण्यात आल्याचा आणि अभयच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच जणांविरोधात लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












