Crime News : मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिसऱ्या पतीची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, आरोपी महिलेला तिच्या प्रियकरासोबत चौथे लग्न करायचे होते आणि याच कारणामुळे त्यांनी पतीला वाटेतून हटवण्याचा कट रचला. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि एका साथीदाराला अटक केली आहे. 27 आणि 28 जूनच्या दरम्यानच्या रात्री सरोज मेहरा हिने प्रियकर महेंद्र मेहरा आणि त्याचा साथीदार विष्णू यांच्यासोबत मिळून पती तुळशीरामची हत्या केली.
ADVERTISEMENT
'अशी' झाली तीन लग्नं
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक माहिती लागली आहे. पोलिसांच्या चौकशीनुसार, आरोपी महिला सरोज मेहरा हिचे पहिले लग्न 2004 मध्ये झाले होते. काही काळाने तिने पहिल्या पतीला सोडले आणि दुसरे लग्न केले. दुसऱ्या पतीच्या निधनानंतर 2006 मध्ये तिने तुळशीरामसोबत तिसरे लग्न केले होते. याच दरम्यान तिचे महेंद्र मेहरासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रेमसंबंधातूनच पुढे हत्येचा कट रचला गेला. दरम्यान, आरोपी महिलेने आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून, प्रियकरानेच तिला मिळवण्यासाठी पतीचा दगाफटका करून खून केल्याचे आणि घटनेच्या वेळी आपण घरातच असल्याचे म्हटले आहे. मात्र, तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट केला आहे.
हे ही वाचा : प्रियकरासोबत रात्री हॉटेलमध्ये आली अन् सकाळी संशयास्पद मृत्यू, तरुणीसोबत काय घडलं?
पोलिसांना आला संशय
पती बेपत्ता झाल्यानंतरही पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार न केल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलीस अधीक्षक ऋषिकेश मीणा यांनी सांगितले की, पती बेपत्ता होऊन तीन दिवस उलटले तरी पत्नीने ना हरवल्याची तक्रार नोंदवली, ना त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या तपासात हीच बाब संशयास्पद ठरली आणि त्यानंतर झालेल्या तांत्रिक चौकशीत संपूर्ण घटनेचा उलगडा होत गेला.
हे ही वाचा : 'अहो..आज व्रत आहे', बायको संबंध टाळायची; शेवटी दाढी करताना सापडली अन् सगळं उलगडलं
तिघांना अटक
पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, महेंद्र मेहरा याने तुळशीरामला राष्ट्रीय महामार्ग-44 वर पार्टीच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर त्याला महामार्गालगतच्या झाडीत नेऊन दोरीने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान हत्येसाठी वापरलेली दोरी आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी सरोज मेहरा, तिचा प्रियकर महेंद्र मेहरा आणि साथीदार विष्णू या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ADVERTISEMENT












