Crime News : एका 20 वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथील रहिवासी असलेल्या या तरुणीची इन्स्टाग्रामवर 'प्रिन्स वर्मा' या नावाने ओळख सांगणाऱ्या एका तरुणाशी मैत्री झाली होती. दोघांमधील संवाद पुढे प्रेमसंबंधात बदलला आणि त्यानंतर तरुणी प्रयागराजला गेली. मात्र काही महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर तिच्या कुटुंबाला कोणतीही माहिती न देता तिचा मृतदेह दफन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्या, बलात्कार, धार्मिक ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणे, धर्मांतरासाठी दबाव टाकणे आणि धमकी देणे यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी साहिल, त्याची आई आणि आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
'प्रिन्स वर्मा' म्हणून ओळख, पण निघाला मोहम्मद साहिल
पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 'प्रिन्स वर्मा' म्हणून ओळख सांगणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव मोहम्मद साहिल असल्याचे नंतर समोर आले. कुटुंबाचा आरोप आहे की, साहिलने आपली खरी धार्मिक ओळख लपवून तरुणीला आपल्या सोबत ठेवले आणि तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. तसेच फसवून तिला प्रयागराजमधील आपल्या घरी नेण्यात आले. विरोध केल्यावर कुटुंबीयांवरही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणीने 10 मे 2026 रोजी आपल्या लहान बहिणीला फोन करून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगितल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, 8 जून रोजी स्थानिक लोकांकडून तरुणीचा मृत्यू झाल्याची आणि तिचा मृतदेह कब्रस्तानात दफन केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबाने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर 16 जून रोजी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कब्र उघडून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदन करण्यात आले. 17 जून रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह अनेक दिवसांनंतर कब्रस्तानातून बाहेर काढण्यात आल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात खराब झाला होता. त्यामुळे शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
वडिलांच्या तक्रारीवरून एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
तपासादरम्यान, तब्येत बिघडल्यानंतर तरुणीला प्रथम खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर प्रयागराजच्या स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर आले. तेथेच तिचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल करताना तिचे नाव 'इकरा खान' असे नोंदवण्यात आले होते, तर पती म्हणून 'साहिल खान' असे नमूद करण्यात आले होते. घटनेनंतर महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर पीडित कुटुंब रीवाहून प्रयागराजला पोहोचले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडित वडिलांच्या तक्रारीवरून एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौंधियारा पोलिसांनी तपास सुरू केला असून, पोस्टमार्टम अहवाल, मोबाईल, सोशल मीडिया चॅटचे फॉरेन्सिक परीक्षण तसेच कॉल रेकॉर्डची छाननी केली जाणार आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री लालमणी तिवारी यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, तसे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
ADVERTISEMENT












