Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गुरुवारी पहाटे 25 वर्षीय मोहित शर्मा या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू शांतिनगर परिसरात घडली. या प्रकरणात शेजारी राहणारे गौरव, देव, हरी आणि त्यांच्या इतर मित्रांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मृताच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून बोलावलं अन् केला खून
मोहितच्या हत्येनंतर संतप्त कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी रस्ता रोको करत संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मोहित आणि आरोपींमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्यानंतर तो मिटल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून मोहितला बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा : 'जेव्हा प्रेमाची गरज होती, तेव्हा प्रेमभंग केला..' मुंबई Tak बैठकीत CM फडणवीसांचे ठाकरेंना टोल्यांवर टोले!
मित्रांमध्ये यापूर्वीही भांडणे झाल्याचे समोर
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजता न्यू शांतिनगर परिसरात एका व्यक्तीला चाकू मारल्याची माहिती आपत्कालीन क्रमांक 112 वरून प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मोहित शर्मा याला उपचारासाठी एमएमजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत तपासाला सुरुवात केली.
प्राथमिक तपासात मोहित आणि त्याच्या मित्रांमध्ये यापूर्वीही भांडणे झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान सर्वजण मद्याच्या नशेत असताना पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. त्याचवेळी आरोपींनी मोहितवर चाकूने वार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहितचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुटुंबीयांकडून तक्रार स्वीकारून संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पुढील वैधानिक कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT












