bengaluru double murder : बेंगळुरूमध्ये रविवारी रात्री अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या हत्या प्रकरणांनी खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेचा मृतदेह तिच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. या दोन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात कारमध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
लग्नाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर अंजलीची हत्या
महालक्ष्मी लेआउट परिसरात लग्नाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर 23 वर्षीय अंजली हिची तिचा प्रियकर राजीव याने चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. अंजली आणि राजीव हे गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. मात्र, आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे अंजलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर काही मिनिटांतच पोलिसांनी राजीवला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : RSS चं कौतुक केल्यानं काँग्रेससह राज ठाकरेंकडून टीकेची झोड, अखेर नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
हत्याकांडांमुळे बंगळुरूमध्ये खळबळ
दुसऱ्या प्रकरणात उत्तर भारतातील 40 वर्षीय कृष्णा बर्मन हिचा मृतदेह बोम्मनहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होंगासंद्रा येथील मुनियप्पा लेआउटमधील तिच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. प्राथमिक तपासात तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हत्या तिच्या परिचयातील व्यक्तीनेच केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी सुरू आहे. दोन्ही हत्याकांडांमुळे बंगळुरूमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपासाची दिशा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये झालेल्या स्फोटात नागेंद्र (30) याचा होरपळून मृत्यू झाला. फॉरेन्सिक अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सीरा तालुक्यातील कल्लंबेला परिसरात कारला आग लावण्यासाठी देशी बॉम्बचा वापर करण्यात आला असावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेपूर्वी नागेंद्र याने कारमधील एका महिलेच्या डोक्यावर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ती महिला कशीतरी कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. महिलेला वाचवण्यासाठी कारचालकानेही वाहनाबाहेर उडी घेतली आणि त्याचवेळी कारमध्ये स्फोट झाला. त्यानंतर कारने क्षणार्धात पेट घेतला आणि त्यामध्ये नागेंद्रचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणाचाही तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












