Nagpur Crime News : नागपूरमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनदरम्यान पबमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीची घटना समोर आली आहे. शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘रास्ता’ नावाच्या पबमध्ये ही घटना घडली. या झटापटीत अनेक युवक जखमी झाले असून एका युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘रास्ता’ पबमध्ये विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली; मात्र काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील युवकांनी एकमेकांवर हल्ला चढवत जोरदार मारामारी केली.
या झटापटीदरम्यान एका युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय काही अन्य युवकही किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पबमधील गोंधळामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा : 'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद... IIT मध्ये कार्यरत असलेल्या महिला टेक्निशिअनने संपवलं आयुष्य
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये दोन गट एकमेकांवर तुटून पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. उपस्थितांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला असून त्यानंतर तो व्हायरल झाला. त्यामुळे या घटनेची शहरभर चर्चा रंगली आहे.
या संदर्भात अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पबमध्ये झालेल्या वादानंतर दोन्ही गटांनी आपसात तडजोड केली आहे. सध्या कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. दोन्ही गट व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी पबमध्ये आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहरात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांदरम्यान योग्य ती सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण आवश्यक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनीही भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे संकेत दिले आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या आनंदोत्सवाला हिंसाचाराचे गालबोट लागल्याने नागपूरमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. वायरल व्हिडिओमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले असून पोलिस पुढील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महिलेचा दीरावर जीव जडला! पतीचा काटा काढण्यासाठी लाखाची सुपारी; कुऱ्हाडीने वार करुन संपवलं
ADVERTISEMENT











