nanded crime news : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह कार गोदावरी नदीत टाकून आत्महत्या केल्याच्या नांदेडमधील घटनेने राज्यभरात खळबळ उडवली होती. मात्र या प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. शुक्रवारी सकाळी पुनेगाव येथील नदी पुलावर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता पोस्टमॉर्टेम अहवालातून मन सुन्न करणारी माहिती समोर आली. आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षक पित्यानेच आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांच्या छातीत आणि पोटात चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून स्वतः भरधाव वेगाने कार चालवत सुमारे 50 फूट खोल गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केल्याचे तपासातून समोर आले. घटनेचा उलगडा झाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत शिक्षकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाचा जामीन रद्द, हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना दणका
सुरुवातीला आत्महत्येचा प्रकार असल्याचे मानले जात होते
सुनील मोरे आणि त्यांची पत्नी धम्मशिला मोरे हे दोघेही हिमायतनगर तालुक्यातील पोटा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना सारा (वय 14) आणि सुमित (वय 10) अशी दोन मुले होती. गुरुवारी सायंकाळी सुनील मोरे हे दोन्ही मुलांना खासगी क्लासला सोडण्याच्या बहाण्याने कारमधून घराबाहेर पडले. मात्र त्यांनी मुलांना क्लासमध्ये न नेता अज्ञात ठिकाणी नेले. दरम्यान, मुले घरी परतली नसल्याने पत्नी धम्मशिला यांनी पतीला फोन करून विचारणा केली. त्यावेळी "माझ्यासोबत मुले नाहीत," असे सुनील मोरे यांनी सांगितल्याची माहिती समोर आली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनेगाव पुलावरून कार थेट 50 फूट खोल गोदावरी नदीत कोसळल्याची घटना घडली. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे मानले जात होते.
हेही वाचा : सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
मात्र पोलिसांच्या तपासादरम्यान आलेल्या पोस्टमॉर्टेम अहवालामुळे संपूर्ण प्रकरणाचे स्वरूपच बदलले. अहवालानुसार आत्महत्येपूर्वी सुनील मोरे यांनी दोन्ही मुलांच्या छातीत आणि पोटात चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. ही हत्या मुलं झोपेत असताना झाली असावी किंवा कारमध्येच करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून "मी माझ्या मुलांना संपवून आत्महत्या करत आहे," असे लिहिले होते. या स्टेटसमध्ये हदगावचे गट शिक्षण अधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्चे, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता विश्वभर पवळे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला होता.
दरम्यान, पती आणि दोन्ही मुले बेपत्ता झाल्यानंतर धम्मशिला मोरे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याचवेळी सुनील मोरे यांनी आपल्या एका सहकाऱ्याला फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी गट शिक्षण अधिकाऱ्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पोस्टमॉर्टेम अहवालातील निष्कर्षानंतर मयत शिक्षक सुनील मोरे यांच्याविरोधातही खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












