Pune Crime News : पुण्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरात कानाखाली मारल्याचा राग मनात धरून एका सुपरवायझरची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश भांमरे असे मृत सुपरवायझरचे नाव असून सिद्धेश साळुंखे असे आरोपीचे नाव आहे. दोघेही तळेगाव एमआयडीसीमधील एकाच कंपनीत काम करत होते. काम व्यवस्थित न केल्यामुळे योगेश यांनी सिद्धेशला फटकारले होते. यावेळी त्याला कानाखाली मारून शिवीगाळही केली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी सिद्धेशने योगेश यांच्या हत्येचा कट रचला.
ADVERTISEMENT
अपमानाचा बदला घेण्यासाठी रचला कट
आरोपी सिद्धेशने योगेश यांना खरवसच्या बहाण्याने बाहेर बोलावले. आपल्या मुलाला खरवस खायचा आहे, असे सांगत त्याने योगेश यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रविवारी (22 नोव्हेंबर) खरवस आणण्यासाठी दोघेही निघाले. योगेश यांनी उर्से टोलनाक्याजवळ आपली गाडी लावली आणि सिद्धेशच्या दुचाकीवर बसले. त्यानंतर सिद्धेशने ओझर्डे गावातील एका गोठ्याच्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्यांना निर्जन परिसरात नेले. या ठिकाणी आरोपीने आधीच कोयता लपवून ठेवला होता. निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने मागून योगेश यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात योगेश यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : हाफिज सईदचं कौतुक करणारा कलाकार अन् नेटफ्लिक्सची पाकिस्तानी सीरिज; 'जो बचे हैं संग समेट लो'वरून भारतात संताप!
पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न
या हत्येनंतर आरोपी सिद्धेश घरी गेला आणि झोपून राहिला. दरम्यान, योगेश घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर तळेगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे, योगेश यांची हत्या करणारा सिद्धेशच त्यांना शोधण्याचे नाटक करू लागला. त्याने आपल्या काकांसोबत दुसऱ्या गाडीने योगेश यांचा शोध घेतला. एवढेच नाही तर पोलिसांनाही तपासात सहकार्य करण्याचा दिखावा केला. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे सिद्धेशवर संशय व्यक्त केला.
हे ही वाचा : सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित पॅनेलची एकहाती सत्ता, मोहिते-पाटलांना धक्का!
कसा सापडला आरोपी?
पोलिसांनी सिद्धेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने योगेश यांच्या हत्येची कबुली दिली. या प्रकरणात आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्येच्या कटात त्याचा नेमका सहभाग काय होता, याचा तपास सुरू आहे. कामावरून झालेला वाद आणि कानाखाली मारल्याचा राग मनात धरून सिद्धेशने आपल्या सहकाऱ्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. खरवस खाण्याचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेणे, आधीच कोयता लपवून ठेवणे आणि हत्येनंतर स्वतःच शोध घेण्याचे नाटक करणे, अशा प्रकारे आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचा बनाव उघड झाला.
ADVERTISEMENT












