सियाने केतनला संपवण्यासाठी लोहगडच का निवडला? एक अवघड चढण अन् मृत्यूचा सापळा...

महाराष्ट्रातील लोहगड किल्ल्यावर 26 वर्षीय केतन अग्रवालचा झालेला मृत्यू हा केवळ एक अपघात नसून, पोलिसांच्या तपासात त्याच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. पण या हत्येसाठी सियाने लोहगडच का निवडला होता?

pune murder case why did siya choose lohagad specifically for ketan murder plan

सियाने केतनला संपवण्यासाठी लोहगडच का निवडला?

मुंबई तक

• 11:07 PM • 24 Jun 2026

follow google news

पुणे: लोहगड किल्ल्याच्या उंच कड्यावरून पडून 26 वर्षीय केतन अग्रवालच्या झालेल्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. सुरुवातीला हा एक अपघात मानला जात असला तरी, पोलिसांच्या तपासातून समोर आलेली कहाणी एखाद्या क्राईम थ्रिलरसारखी आहे. पोलिसांचा आरोप आहे की, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी त्याच्या हत्येचा कट रचून 18 जून रोजी त्याला कड्यावरून खाली ढकलले. आता या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, काही महिन्यांतच लग्न होणार असलेली एक तरुणी तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या जीवावर का उठली?

हे वाचलं का?

केतनचे वडील, विशाल अग्रवाल, आपल्या मुलाची आठवण काढून भावुक होतात. ते म्हणाले, "तो माझ्या म्हातारपणी माझा आधार होणार होता. मला आशा होती की तो आयुष्यभर माझ्यासोबत राहील आणि एक दिवस माझ्या चितेला अग्नी देईल. पण कुणाच्यातरी गुन्हेगारी कृत्याने माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतलं.''

हे का घडले, हे समजून घेण्याचा प्रयत्न कुटुंब अजूनही करत आहे. पोलीस येत्या काही दिवसांत हत्येमागील हेतू उघड करू शकतात, परंतु केतनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लोहगड किल्ल्यावर वारंवार केलेल्या ट्रिप, बालीची सहल रद्द करणे, हत्येचा अयशस्वी प्रयत्न आणि त्यानंतर पुन्हा लोहगडावर ट्रेक, या सर्व गोष्टी आता तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.

प्रश्न: ते जोडपे लोहगडला वारंवार का भेट देत होते?

इंडिया टुडेच्या ओपन सोर्स इंटेलिजन्स (OSINT) टीमने लोहगड किल्ल्याचा भूगोल, उंची आणि सभोवतालच्या परिसराचा अभ्यास केला. तपासात असे आढळून आले की, हा किल्ला सभोवतालच्या परिसरापेक्षा अंदाजे 600 फूट उंच आहे. येथे उंच कडे, खोल दऱ्या आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असलेले अनेक भाग आहेत, जे अत्यंत दुर्गम आहेत.

हे ही वाचा>> बॉयफ्रेंडच्या 3 चुकांमुळे सिया सापडली, थंड डोक्याने केलेल्या खुनाचा पोलिसांकडून उलगडा

शतकांपूर्वी सुरक्षेच्या उद्देशाने बांधलेल्या या किल्ल्याची रचना अशी आहे की, काही ठिकाणी गर्दीचे रस्ते अचानक निर्मनुष्य आणि धोकादायक कोपऱ्यांमध्ये बदलतात. विशेषतः उन्हाळ्यात आणि मान्सूनपूर्व काळात पर्यटकांची संख्या कमी होते, ज्यामुळे अनेक भाग अधिकच निर्मनुष्य होतात. यामुळेच लोहगडवरून केतनला ढकलून देण्याचं ठिकाण जाणीवपूर्वक निवडले गेले होते का?, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

फेब्रुवारीमध्ये साखरपुडा, मे मध्ये पहिल्यांदा लोहगडावर

केतन आणि सिया यांचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने, काही महिन्यांनंतर त्यांच्या लग्नाचे नियोजन करण्यात आलेले. 31 मे रोजी त्यांनी पहिल्यांदाच एकत्र लोहगड किल्ल्याला भेट दिलेली. 5 जून रोजी पुन्हा भेट देण्याबद्दल चर्चा झाली होती, पण तो बेत बारगळलेला. केतनच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांना पुन्हा त्याच किल्ल्यावर जायचे होते हे कुटुंबाला विचित्र वाटले, पण त्यांना त्यात काही घातपाताचा संशय आला नाही.

बालीची सहलही होऊ शकली नाही

6 जून रोजी चार जणांसाठी बालीच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. पण विमानतळावर केतनचा पासपोर्ट कथितरित्या चोरीला गेल्याने, संपूर्ण सहल रद्द करावी लागलेली आणि सर्वांना परतावे लागले होते. या घटनेनंतर, केतन आणि सिया 14 जून रोजी लोहगडला पुन्हा गेले. बालीची सहल रद्द झाल्यामुळे आणि पूर्वीची योजनाही अपूर्ण राहिल्यामुळे कुटुंबाने त्यांना लोहगडची परवानगी दिलेली.

हे ही वाचा>> केतनने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जपलं, शेवटी सियाने थंड डोक्याने दगा दिला, फोटो व्हायरलं!

14 जून रोजी झालेला पहिला प्रयत्न?

पोलीस आता 14 जूनच्या घटनेला हत्येचा पहिला प्रयत्न मानत आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या मते, सियाने त्या दिवशी केतनला कड्यावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, झाडाच्या फांदीने त्याला खाली पडण्यापासून वाचवल्यामुळे तो बचावला होता. पोलिसांचा दावा आहे की, या घटनेनंतर सियाने केतनला सांगितले की, तिने कड्याच्या टोकावर एक साप पाहिला होता आणि घाबरून त्याला वाचवण्यासाठी तिने त्याला ढकलले होते. केतनने तिच्यावर विश्वास ठेवला आणि या घटनेला एक अपघात मानले.

14 जूनची घटना खरंच हत्येचा अयशस्वी प्रयत्न होता का आणि ज्या व्यक्तीवर त्याने विश्वास ठेवला होता, ती त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे याची केतनला कल्पना नव्हती का, हे तपास यंत्रणा आता निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

18 जून रोजी मृत्यू

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 18 जून रोजी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी केतनला लोहगड किल्ल्यावरील कड्यावरून खाली ढकलले. सुरुवातीला हे प्रकरण एक अपघात असल्याचे वाटत होते, कारण सियाने अधिकाऱ्यांना सांगितले होते की, केतन घसरून खाली पडला. मात्र, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान अनेक गोष्टी संशयास्पद वाटल्या. केतन एक अनुभवी ट्रेकर होता आणि त्याच्या अचानक घसरून पडण्याची शक्यता कमी मानली जात होती. या आधारावर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

सीसीटीव्हीमधून एका कटाचा खुलासा

तपासादरम्यान, पोलिसांनी लोहगड येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये केतन आणि सिया एकत्र चालताना दिसत होते. त्यांच्या मागे हुडी घातलेला एक तिसरा माणूसही दिसत होता, ज्याचा चेहरा मोठ्या प्रमाणात अस्पष्ट होता. एका क्षणी, सिया मागे वळून पाहताना दिसते, तर तो माणूस अचानक खाली बसतो. त्या दिवशी तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस होते. उष्णता असूनही कोणीतरी हुडी घातली होती, हे पोलिसांना संशयास्पद वाटले.

इंडिया टुडेने लोहगड किल्ल्याचे गेटकिपर धीरज जाधव यांच्याशीही संवाद साधला. त्यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी त्यांनी एका माणसाला पाहिले होते, जो नंतर चेतन चौधरी असल्याचे निष्पन्न झाले. त्याने मास्क आणि संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घातले होते. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याला 25 रुपयांचे प्रवेश तिकीट घेण्यास सांगितले, तेव्हा त्याने व्यायामासाठी आल्याचे सांगून स्वतःची ओळख सांगितली आणि तिकीट घेण्यास नकार देत किल्ल्याच्या दिशेने निघून गेला.

वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने आमंत्रित

केतनच्या वडिलांचे म्हणणे आहे की, 18 जूनला लोहगडची टूर ही 19 जून रोजी होणाऱ्या सियाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनशी संबंधित होती. त्यांनी सांगितले की, सियाने केतनच्या आईला फोन करून मित्रांसोबत तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाण्याची परवानगी मागितली होती. कुटुंबाने सुरुवातीला तिचा वाढदिवस महाबळेश्वर मंदिरात साजरा करण्याचे ठरवले होते, पण नंतर केतनला जाण्याची परवानगी दिली. ही त्यांच्या मुलासोबतची शेवटची भेट असेल असं त्यांना वाटलंही नव्हतं.

केतनच्या मृत्यूनंतर, सियाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही लिहिली होती, ज्यात तिने म्हटले होते, "तू मला माझ्या वाढदिवशी सोडून गेलास. आपण लग्नाच्या इतके जवळ होतो."

परंतु त्यानंतर पोलिसांनी केलेल्या आरोपांमुळे या पोस्टला आणि संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. सध्या, पुणे न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, केतनचे वडील सातत्याने तोच प्रश्न विचारत आहेत: "जर तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते, तर तिने नकार दिला असता. आम्ही लग्न तात्काळ रद्द केले असते. तिला माझ्या मुलाचा जीव घेण्याची काय गरज होती?"