पुणे: वाढलेली दाढी, पोलिसांना चकमा... पुण्याच्या सचिन घायवळच्या अटकेची Inside Story

Sachin Ghaywal: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संघटित गुन्हेगारी आणि 'मोका' (MCOCA) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील नऊ महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात आरोपी सचिन बन्सीलाल घायवळ याला राजस्थानमधून अटक केली आहे. वाचा त्याच्या अटकेची Inside Story.

sachin ghaywal arrested grown out beard evading the pune police how did pune police catch ghaywal pune crime news

सचिन घायवळला अटक

मुंबई तक

• 09:43 PM • 05 Jun 2026

follow google news

पुणे: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाईत मोठे यश मिळाले आहे. मोका (MCOCA) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील आणि तब्बल नऊ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी सचिन घायवळ याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. घायवळ टोळीशी संबंधित गुन्ह्यात तो आरोपी असून त्याच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

विशेष पथकाने राबवली शोधमोहीम

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक कार्यरत होते. कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घायवळ टोळीशी संबंधित गुन्ह्यातील आरोपी सचिन घायवळ गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

हे ही वाचा>> परदेशात पळून जाण्यापूर्वी निलेश घायवळने मामाच्या शेतात लपवलेली 'ती' गोष्ट, पोलिसांच्या हाती...

दरम्यान, तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी राजस्थानमध्ये लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून अटक

तपासादरम्यान सचिन घायवळ हा राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील धिंगपूर परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-३ चे पथक तातडीने राजस्थानला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. आरोपी धिंगपूर परिसरातील एका भाड्याच्या घरात एकटाच राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.

रात्री 10.30 वाजता कारवाई

पोलीस उपायुक्त गोवर हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन घायवळ याला राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. मोबाइल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांचे पथक आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपी दिसताच त्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले.

हे ही वाचा>> Pune: कारला साईड न दिल्याने कोथरूडमध्ये थेट गोळीबार, कोण आहे निलेश घायवळ ज्याची गँग घालतेय पुण्यात राडा

अटकेदरम्यान आरोपीकडून एटीएम कार्डसह काही अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याची सविस्तर चौकशी सुरू असून फरार असताना त्याला कोणी मदत केली, तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याच्या लपून राहण्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

पुण्यात आणून न्यायालयात हजर

अटकेनंतर सचिन घायवळ याला पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून फरारी काळातील हालचाली, आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारी नेटवर्कबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान, निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्यातील नेमके संबंध काय आहेत, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चौकशीतून या संदर्भातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

तपासाला मिळणार वेग

घायवळ टोळीशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी सचिन घायवळची अटक महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांच्या मते, त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे टोळीच्या कार्यपद्धती, सहकारी आरोपी आणि इतर गुन्ह्यांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात.

तब्बल नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला राजस्थानमधून शोधून काढत अटक करण्यात आल्याने पुणे गुन्हे शाखेच्या या कारवाईचे विशेष कौतुक होत असून संघटित गुन्हेगारीविरोधातील लढ्यात पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.