साताऱ्यात गोळीबाराचा थरार, लोकनियुक्त सरपंचाने कोणावर झाडल्या गोळ्या?

मुंबई तक

• 12:37 PM • 19 Jul 2026

satara umbraj firing financial dispute : उंब्रजजवळ पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे रूप थेट गोळीबारात बदलले. या प्रकरणी लोकनियुक्त सरपंचासह दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

satara umbraj firing financial dispute

satara umbraj firing financial dispute

Google CTA

बातम्या हायलाइट

point

साताऱ्यात गोळीबाराचा थरार

point

लोकनियुक्त सरपंचाने कोणावर झाडल्या गोळ्या?

satara umbraj firing financial dispute : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात पैशाच्या व्यवहारातून मध्यरात्री थरारक गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत संतोष घोलप या व्यक्तीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कालगावच्या लोकनियुक्त सरपंचासह दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके रवाना केली असून या घटनेमुळे उंब्रज परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पेरले गावच्या हद्दीतील इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर घडली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

आर्थिक वादातून गोळीबार, जखमीच्या दोन्ही पायांना लागली गोळी 

जखमी संतोष शंकर घोलप हे मूळचे कालगाव येथील असून सध्या उंब्रज येथे वास्तव्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशाच्या व्यवहारावर चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूप गंभीर घटनेत बदलले. गोळीबारानंतर संतोष घोलप यांना तातडीने कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाचा जामीन रद्द, हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना दणका

दोन राऊंड गोळीबार केल्याचा आरोप

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, कालगावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ रमेश चव्हाण आणि त्यांचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित यांनी आर्थिक व्यवहारावरून संतोष घोलप यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर पिस्तूलातून दोन राऊंड गोळीबार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. गोळ्या चुकवण्याचा प्रयत्न करत असताना त्या संतोष घोलप यांच्या उजव्या आणि डाव्या पायाला लागल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात सध्या शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही पिस्तूलाचा वापर झाल्याने संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आर्थिक व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट गोळीबारापर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास उंब्रज पोलीस करत आहेत.