वाशिम: वडील दारूच्या नशेत आईला मारहाण करत असल्याच्या कारणावरून मुलाने वडिलांना दांड्याने मारहाण केली आणि उपचारासाठी घेऊन जात असताना गळा आवळून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. त्यानंतर मृतदेह जालना जिल्ह्यातील एका विहिरीत फेकून दिल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
फिर्यादीनुसार, ही घटना 1 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद येथे घडली. सुनिल देवकर याने त्याचे वडील राजेश उर्फ राजू किसन देवकर यांना दांड्याने जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर त्यांच्या हात-पायांना बांधून त्यांना बाजेवर ठेवण्यात आले.
हे ही वाचा>> बायकोचा दुसऱ्याच पुरुषावर जीव, दारूचे आमिष दाखवून नवऱ्याला जंगलात पुरलं
दरम्यान, सुनिलचा भाऊ अनिल देवकर घरी आल्यानंतर दोघांनी मिळून वडिलांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना गाडीत बसवण्यात आले. मात्र, प्रवासादरम्यान राजेश देवकर शिवीगाळ करत असल्याने सुनिलने रुमालाने त्यांचे तोंड आणि गळा बांधल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
काही वेळाने त्यांचा आवाज बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर तपासणी केली असता ते मृतावस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर दोन्ही भावांनी मृतदेह जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाघ्रुळ डोंगरगाव शिवारात संतोष पडुळ यांच्या शेतातील विहिरीत टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हे ही वाचा>> विवाहबाह्य प्रकरणाबाबत बायकोनं नवऱ्याला विचारला जाब, पतीने धारदार शस्त्राने संपवलं
दरम्यान, वडिलांना दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांनी गाडीतून उडी मारून पळ काढल्याचे दोन्ही भावांनी गावात सांगितल्याची माहिती आहे. मात्र, अनिलने ही घटना भावाला सांगितल्यानंतर सिताराम यांनी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित विहिरीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी सुनिल राजू देवकर (25) आणि अनिल राजू देवकर (27) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238(अ) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना वाकद, ता. रिसोड, जि. वाशिम येथे घडल्याने गुन्हा पुढील तपासासाठी रिसोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












