पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्याचा राग, नवऱ्याने पोटच्या मुलांना शॉक देऊन संपवलं

मुंबई तक

• 01:44 PM • 13 Jul 2026

Tamilnadu Crime News : पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्याने नैराश्यात गेलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलांचा विजेचा धक्का देऊन खून केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने तुतिकोरिन जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Tamilnadu Crime News

Tamilnadu Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्याचा राग

point

नवऱ्याने पोटच्या मुलांना शॉक देऊन संपवलं

Tamilnadu Crime News : तामिळनाडूतील तुतिकोरिन जिल्ह्यातील सावेरीयारपुरम येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्याने मानसिक तणावात असलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलांचा विजेचा धक्का देऊन खून केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये ट्रक चालक मेरी मायकेल, त्याची 14 वर्षीय मुलगी मेरी निरोशा आणि 12 वर्षीय मुलगा मेरी केनिस्टन यांचा समावेश आहे. दोन्ही मुले एका खासगी शाळेत अनुक्रमे नववी आणि सातवीत शिक्षण घेत होती.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'सेव्हन स्टारमध्ये नेते आणि चेलेच.., ही सेवा नाही तर मेवा' राजदीप सरदेसाईंनी केली पोलखोल!

पत्नी घर सोडून गेल्यानंतर तो सतत मानसिक तणावाखाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायकेलची पत्नी सुमारे सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी घर सोडून गेली होती. या घटनेनंतर मायकेल मानसिक नैराश्यात गेला होता. त्यामुळे त्याने ट्रक चालक म्हणून नियमित कामावर जाणेही बंद केले होते. त्याऐवजी तो अधूनमधून रंगकामाची कामे करून उदरनिर्वाह करत होता. पत्नी घर सोडून गेल्यानंतर तो सतत मानसिक तणावाखाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा : जेजुरी अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर स्वत:ही केली आत्महत्या 

शुक्रवारी मायकेलने आपल्या दोन्ही मुलांसाठी जेवण आणले आणि त्यांना झोपण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मुलांच्या शरीराला विजेच्या तारा बांधून त्या वीजपुरवठ्याशी जोडल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याने त्याच विद्युत तारेच्या साहाय्याने स्वतःचाही जीव घेतला. या संपूर्ण घटनेच्या वेळी मायकेलचे 75 वर्षीय वडील अँथनी मुथू हे घरातच राहत असून ते खोलीबाहेर झोपले होते.

शनिवारी दुपारपर्यंत खोलीचा दरवाजा न उघडल्याने अँथनी मुथू यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पुडुकोट्टाई पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिघांचेही मृतदेह एका खाटेवर पडलेले आढळले. त्यांच्या शरीराला विजेच्या तारा बांधलेल्या होत्या. त्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी तुतिकोरिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पुडुकोट्टाई पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.