Crime News : तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील मोथे गावाच्या बाहेरील भागात 11 ऑगस्टच्या रात्री एका दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या दोघांचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी काही स्थानिक नागरिकांना शेतजमिनीत त्यांचे अर्धवट पुरलेले मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांची पथके घटनास्थळी पोहोचली आणि स्थानिक गाव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमीन खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आले तसेच त्यांची ओळख पटवण्यात आली.
ADVERTISEMENT
24 तासांत हत्याकांडाचा उलगडा
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आणि हे दुहेरी हत्याकांड असल्याचे निष्पन्न झाल्यावर आरोपींचा शोध तीव्र केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने अवघ्या 24 तासांत या हत्याकांडाचा उलगडा केला. या तपासात एका पोलीस कॉन्स्टेबलसह दोन जणांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. या दोन्ही आरोपींना सूर्यापेटच्या नवीन बस स्टँडजवळून ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली असून, चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा : आईनं पोटच्या लेकीवर प्रियकराला अत्याचार करण्यास भाग पाडले अन्..
कॉन्स्टेबलने केली तीन लाखांची मदत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दाम्पत्य कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर मोथे पोलीस ठाण्यात ये-जा करत असे, जिथून त्यांची कॉन्स्टेबलसोबत ओळख झाली होती. जावई पैशांसाठी त्रास देत असल्याचे दाम्पत्याने सांगितल्यानंतर कॉन्स्टेबलने त्यांना सुमारे 3 लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. मात्र, हे दाम्पत्य सदर रक्कम परत करू शकत नव्हते; एवढेच नाही तर त्यांनी कॉन्स्टेबलच्याच विरोधात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. याच रागातून कॉन्स्टेबलने दोघांनाही मार्गातून हटवण्याचा कट रचला.
हे ही वाचा : लव्ह मॅरेज, बाळही झालं अन् नंतर हत्या, स्वीटी पटेल केसमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप
'अशी' केली हत्या
हत्येचा कट रचताना आरोपीने दाम्पत्याला मेंढी पालनाच्या कर्जाचे आमिष दाखवले आणि प्रक्रियेसाठी जागा पाहण्याच्या व मेंढ्या दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना गावाबाहेर एका निर्जन स्थळी बोलावले. ठरलेल्या योजनेनुसार, कॉन्स्टेबल आणि त्याच्या साथीदाराने प्रथम पतीला तिथे नेले आणि तो खड्डा खोदत असतानाच त्याच्यावर दगडाने हल्ला करून त्याची हत्या केली व मृतदेह पुरला. त्यानंतर पत्नीला फोटो काढण्याच्या बहाण्याने तिथे बोलावून तिचीही हत्या केली आणि मृतदेह खड्ड्यात पुरून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. या सर्व धक्कादायक प्रकारानंतर आता पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ADVERTISEMENT












