Solapur Pune Highway Accident- विजय बाबर: सोलापूर-पुणे महामार्गावर देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या महामार्गावर मोहोळ जवळील देवडी पाटीजवळ शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. संबंधित घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडाला धडकली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जवळपास 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पनवेल येथून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. कार चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडाला धडकली आणि ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या कारमध्ये एकूण सहा प्रवासी असून यात तीन पुरुष आणि तीन महिला होत्या.
हे ही वाचा: मुंबई महापालिकेत मविआ सत्तेपासून 15 जागा दूर राहिली, अन् ठाकरे गट अन् काँग्रेसला 30 जागांवर मतविभाजनचा फटका
कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू
या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक कार्यवाही करण्यात आली. मात्र, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता आणि त्यातील एक महिला गंभीररित्या जखमी होती. संबंधित महिलेला तातडीने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: पतीने नवा मोबाईल घेऊन दिला नाही... नैराश्यात गेलेल्या पत्नीने संपवलं आयुष्य!
दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असून अपघातातील मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम मोहोळ पोलीस करत आहेत. या घटनेमुळे, परिसरात खळबळ उडाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वेग आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT











