Crime News: उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे मागील महिन्यात 3 कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. आता, या चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. सदर बाजार पोलीस स्टेशन आणि स्वाट सर्व्हिलान्स टीमने संयुक्त कारवाईत पाच आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून हिरे आणि सोन्याचे दागिने तसेच कोट्यवधी रुपयांची रोकड देखील जप्त केल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ते चोर चोरी केल्यानंतर लंगडत चालत होते.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
ही चोरीची घटना 23 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दिल्ली रोडवरील टाटा CARATLANE शोरूमची भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केली. स्टोअर मॅनेजरच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, पोलिसांचं विशेष पथक तयार करण्यात आलं. गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस आणि स्वाट टीमने खलासी लाईनजवळून इर्शाद उर्फ काला, दिलशाद, सलमा, काली आणि सीमा या पाच आरोपींना अटक केल्याचं वृत्त आहे. तसेच, आरोपींकडून सोने आणि हिऱ्यांचे दागिने, अंदाजे 45 हजार 100 रुपये रोख आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे 3 कोटी असल्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा: राहुल गांधींना सलग दुसऱ्या दिवशीही 'त्यावर' बोलू दिलं नाही! लोकसभेतील नेमका गोंधळ काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी इर्शाद उर्फ काला हा एक कुख्यात गुन्हेगार आहे ज्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. चौकशीदरम्यान, तो भंगार विक्रेत्याच्या वेशात सुमारे एक महिन्यापासून शोरूमवर पाळत ठेवत असल्याचं आरोपीने कबूल केलं. घटनेच्या रात्री खराब हवामानाचा फायदा घेत तो भिंत तोडून शोरूममध्ये घुसला आणि सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी त्याने चेहऱ्यावर मास्क घातलं होतं.
इतकेच नव्हे तर, आरोपीने चोरी झाल्यानंतर ओळख लपवण्यासाठी कपडे बदलले आणि लंगडत चालण्याचं नाटक केलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने चोरीचे दागिने इतर राज्यात विकण्याचा प्रयत्न करत होते. अटक केलेल्या आरोपींवर संबंधित कलमांखाली आरोप लावले जात आहेत आणि त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. सध्या, पोलीस संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहेत आणि इतर राज्यांमध्ये घडलेल्या घटनांशी या टोळीचा संबंध आहे का? हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT











