UP Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात महिला आयएएस अधिकाऱ्याच्या निवासस्थानी देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कीडगंज परिसरात असलेल्या या घरावर पोलिसांनी छापा टाकून देहव्यापाराच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत चार तरुणी आणि पाच तरुणांना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
IAS अधिकाऱ्याचं घर भाड्याने घेतलं, पण देहव्यापार सुरु केला
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश द्विवेदी नावाच्या व्यक्तीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी महिला आयएएस अधिकाऱ्यांकडून हे घर भाड्याने घेतले होते. तो आपल्या कुटुंबासह राहणार असल्याचे सांगून दरमहा 15 हजार रुपये भाडे देण्याचे मान्य करण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस त्याने प्रत्यक्षात कुटुंबीयांना घरात ठेवले, त्यामुळे अधिकाऱ्यांना कोणताही संशय आला नाही. मात्र, काही काळानंतर त्याने कुटुंबीयांना अतरसुइया भागातील त्यांच्या जुन्या घरात पाठवले आणि या घरात बेकायदेशीर देहव्यापार सुरू केला.
गेल्या काही आठवड्यांपासून या घरात उशिरापर्यंत तरुण-तरुणींची ये-जा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना संशय येऊ लागला. सतत अनोळखी लोकांची वर्दळ, रात्रीच्या वेळची गडबड आणि संशयास्पद हालचाली यामुळे परिसरातील वातावरण अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर स्थानिकांनी धाडस करून याबाबत पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर प्रयागराज पोलिसांच्या पथकाने संबंधित घरावर अचानक छापा टाकला. पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने पोलिसांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. छाप्यादरम्यान घरातील वेगवेगळ्या खोल्यांमधून चार तरुणी आणि पाच तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. या सर्वांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
पोलिस तपासात उघड झाले की, पकडण्यात आलेल्या चार तरुणींमध्ये एक पश्चिम बंगालची, एक वाराणसीची तर दोन प्रयागराजमधीलच आहेत. तर ताब्यात घेण्यात आलेले पाचही तरुण स्थानिक असल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सर्वेश द्विवेदी घराबाहेर उभा राहून परिसरावर नजर ठेवत होता, जेणेकरून पोलिस किंवा शेजाऱ्यांना संशय येऊ नये. मात्र, पोलिसांनी त्यालाही रंगेहाथ पकडले.
या संपूर्ण प्रकारात महिला आयएएस अधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. करारात कुटुंबासह राहण्याची अट असताना, घराचा गैरवापर करून ते देहव्यापाराचे केंद्र बनवण्यात आले. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात अनैतिक देहविक्री प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात तसेच प्रशासनात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, भाड्याने दिलेल्या घरांचा गैरवापर कसा टाळावा याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











