Crime News : नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलेल्या एका 8 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मुलीला एका नराधमाने लग्नाच्या मंडपातून उचलून नेले आणि जवळच असलेल्या झाडीत नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केले. ही घटना शुक्रवारी (19 फेब्रुवारी) रात्री उशिरा घडली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आधी भाजप आमदार, आता राष्ट्रवादी मंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल; भिगवण कथित अपहरण प्रकरणाला राजकीय वळण
निर्जनस्थळी नेऊन बलात्कार
शुक्रवारी रात्री लग्नाचा सोहळा सुरु होता. रात्री उशिरा लग्न समारंभ सुरु असताना सर्व पाहुणे त्यामध्ये गुंतले होते. याचा फायदा घेत आरोपीने मुलीला फूस लावून लग्नाच्या ठिकाणापासून 200 मीटर दूर असलेल्या निर्जन स्थळी नेले. मुलगी बराच वेळ दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरु केली, तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळून आली. सध्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिला उपचारासाठी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ड्रोनच्या सहाय्याने आरोपीचा शोध
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास चक्रं फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आणि लग्नसमारंभात चित्रीकरण करणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये एक तरुण मुलीचा हात धरुन तिला मंडपाबाहेर नेताना स्पष्टपणे दिसून आला. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अशोक निषाद ऊर्फ नाटे या आरोपीला शोधून काढले आणि त्याला बेड्या ठोकल्या.
हे ही वाचा : जालना : चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर अत्याचार, 28 वर्षीय नराधम ताब्यात
आरोपीची रवानगी तुरुंगात
पीडित मुलीच्या आजोबांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (20 फेब्रुवारी) पहाटे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास केला. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून पीडित मुलीवर उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT











