Crime News : प्रेमविवाहानंतर अवघ्या पाचच महिन्यात नवऱ्याने आपल्या गर्भवती बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे बायकोची हत्या करुन नवऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास करत असतानाच पोलिसांना दोघांमध्ये असलेल्या वादाची आणि ताणतणावाची माहिती मिळाली. या मृत दाम्पत्याची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे आणि लग्नानंतर पाचच महिन्यात असं नेमकं काय घडलं की दोघांनाही आपला जीव गमवावा लागला.
ADVERTISEMENT
पाच महिन्यांपूर्वी लग्न
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील. शादाब आणि निकहत निशा असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. निकहत ही मुंबईची तर शादाब गोरखपूरचा. मुंबईच्या मुक्त आणि आधुनिक जीवनशैलीतील वातावरणात निकहत लहानाची मोठी झाली. तर शादाब हा ग्रामीण वातावरणात वाढलेला. असं असलं तरी दोघांमध्ये सुरु असलेल्या संवादातून ते एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. दोन्ही कुटुंबानीही त्यांच्या नात्याला विरोध केला नाही आणि पाच महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर निकहत गोरखपूरमधील मुकारीपूर गावात शादाब आणि त्याच्या कुटुंबियांसोबत राहू लागली.
हे ही वाचा : कोल्हापूर : पत्नी अन् 2 लेकरांचा डोळ्यासमोर मृत्यू, अडीच वर्ष आठवणींनी छळलं; शेवटी...
कपड्यांवरुन वाद
निकहत मुंबईत वाढलेली असल्यानं ती लोअर टीशर्ट घालायची. तिच्या या कपड्यांच्या सवयीवरुन दोघांमध्ये सतत कुरबुरी व्हायच्या. शादाब तिला कपड्यांवरुन टोकायचा हे तिला आवडायचं नाही. तर दुसऱ्या बाजूला निकहतला आपल्या नवऱ्याचे जुन्या काळाप्रमाणे वागणं आवडायचं नाही. तसंच तो काही कामधंदा करत नसल्याने ती नाराज होती. यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे.
हे ही वाचा : हॉटेलच्या रुममध्ये हिडन कॅमेरे, तसले व्हिडीओ करायचे शूट; अन्.., शेवटी काय घडलं?
'त्या' रात्री काय घडलं?
शादाबची आई नजीबुन यांनी सांगितले की 'घटनेच्या दिवशी म्हणजे 11 मे रोजी शादाब आणि निकहत नाराज दिसत होते आणि एकमेकांपासून लांब बसले होते. याचं कारण त्यांना विचारलं तर दोघंही गप्पच बसले. जेवण झाल्यानंतर दोघं आपल्या रुममध्ये गेले. त्यानंतर सकाळी म्हणजे 12 मे रोजी त्यांच्या रुमचा खूप उशीरापर्यंत दरवाजा न उघडल्याने आणि आवाज देऊनही आतून काहीच प्रतिक्रिया न आल्याने खिडकीतून वाकून बघितले. तेव्हा मी हादरुन गेले. शादाबचा मृतदेह पंख्याला लटकला होता, तर निकहत बेडवर पडली होती आणि तिच्या तोंडातून फेस येत होता.'
यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले. पोस्ट मार्टमचा अहवाल येण्याआधी सर्वजण असे समजत होते की दोघांनी आत्महत्या केली आहे. मात्र रिपोर्ट आला आणि सगळेच हादरुन गेले.
हे ही वाचा : 'माझ्याकडे दैवी शक्ती..' 54 वर्षीय अब्दुलकडून 7 जणींवर बलात्कार
पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक सत्य समोर
पोस्ट मार्टम अहवालातून अशी माहिती समोर आली की, निकहतची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे आणि ती प्रेग्नंट होती. शादाबने आधी तिची हत्या केली आणि नंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नाच्या पाचच महिन्यानंतर झालेल्या मृत्यूमुळे दोनीही कुटुंबाना धक्का बसला आहे. शहरी आणि ग्रामीण संस्कृतीतील या संघर्षात एका दाम्पत्याचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











