Crime News : एका वृद्ध महिलेच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. 69 वर्षीय निर्मला यांची त्यांच्या राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी (21 मार्च) दुपारी जेव्हा त्यांचा नातू घरी परतला, तेव्हा त्याला आपली आजी मृतावस्थेत पडलेली दिसली. तिचे हात-पाय बांधलेले होते आणि गळा दाबल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासचक्रं फिरवली, ज्यामध्ये एका धक्कादायक आणि संतापजनक कटाचा पर्दाफाश झाला. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
घरातीलच कोणीतरी हत्या केल्याचा संशय
घटनेच्या वेळी घरातील पुरुष सदस्य कामावर गेले होते, मात्र सून रंजना घरातच होती. तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मोठी तफावत आढळली. घराबाहेर सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कॅमेरे दुपारी 2 ते 4 या वेळेत जाणीवपूर्वक बंद करण्यात आले होते. या संशयावरून पोलिसांनी आजूबाजूचे कॅमेरे तपासले असता, त्याच इमारतीत राहणारा भाडेकरू राजन शर्मा संशयास्पद रित्या घराबाहेर पडताना दिसला. विशेष म्हणजे, घराचा मुख्य दरवाजा सुरक्षित होता आणि कोणतीही जबरी चोरी झाली नव्हती. यामुळे ही हत्या घरातीलच कोणीतरी केली असावी, असा संशय पोलिसांना आला.
हे ही वाचा : साडेसातीचा त्रास संपला, आता फक्त प्रगती आणि आनंद! शनिदेवांच्या कृपेने 'या' राशींचे नशीब उजळणार
श्वानपथकामुळे सापडला आरोपी
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जेव्हा फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला बोलावण्यात आले, तेव्हा एखाद्या सिनेमात शोभावा असा थरार पाहायला मिळाला. पोलिसांचा कुत्रा थेट घटनास्थळावरून बाहेर आला आणि तिथेच उभ्या असलेल्या राजन शर्माजवळ जाऊन थांबला. आरोपी राजन हा अतिशय चलाख होता; तो पोलीस तपास सुरू असताना तिथेच वावरत होता आणि आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचा खोटा आव आणत होता. मात्र, श्वान पथकाने त्याला ओळखताच तो घाबरला आणि कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा : अशोक खरात प्रकरण: 2 मित्र, 2 FIR आणि कंबरेजवळ घेतलेले पाय.. खळबळ उडवून देणारी Inside Story
भाडेकरुसोबत अफेयर
चौकशीत समोर आलेली माहिती सुन्न करणारी आहे. सून रंजना आणि भाडेकरू राजन शर्मा यांचे गेल्या काही काळापासून अनैतिक संबंध होते. निर्मला देवी यांनी या संबंधांना तीव्र विरोध दर्शवला होता आणि अनेकदा त्यांनी दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडले होते. प्रेमाच्या आड येणाऱ्या सासूचा काटा काढण्यासाठी रंजनाने प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचला. शनिवारी दुपारी दोघांनी मिळून निर्मला देवी यांचा गळा आवळून त्यांचा जीव घेतला. सध्या पोलिसांनी रंजना आणि राजन या दोघांनाही अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
ADVERTISEMENT











