Crime News : एका स्विमिंग पूलमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 18 वर्षीय सोहिल गावातील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. आरोप आहे की, तिथे पोहत असताना गावातीलच एका दुसऱ्या तरुणाने सोहिलला पाण्यात बुडवून त्याचा जीव घेतला. सुरुवातीला ही घटना केवळ पाण्यात बुडून झालेला अपघात समजली जात होती, परंतु जेव्हा कुटुंबियांनी संशयावरून सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा हत्येचे अंगावर काटा आणणारे भीषण सत्य समोर आले. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
पायात काय आहे बघितलं अन्...
या थरारक गुन्ह्याची माहिती तेव्हा मिळाली, जेव्हा स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीच्या पायात सोहिलचा मृतदेह अडकला. त्याने तातडीने स्विमिंग पूलच्या मालकाला याची माहिती दिली, ज्यानंतर सोहिलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून कुटुंबियांना कळवण्यात आले. कुटुंबिय मृतदेह घरी घेऊन गेले, पण सोहिलला खूप चांगल्या प्रकारे पोहता येत असताना तो स्विमिंग पूलमध्ये कसा बुडू शकतो, असा संशय त्यांना आला. या संशयापोटी कुटुंबियांनी स्विमिंग पूलवर जाऊन तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सोहिलच्या मृत्यूचे भयानक वास्तव स्क्रीनवर दिसले.
व्हिडिओमध्ये गावातीलच आरोपी तरुण सोहिलला जवळजवळ दोन मिनिटे पाण्यात जबरदस्तीने बुडवत असल्याचे दिसून आले. सोहिल स्वतःला वाचवण्यासाठी पाण्यात तडफडत होता, पण जोपर्यंत त्याचा श्वास थांबला नाही, तोपर्यंत आरोपीने त्याला सोडले नाही. धक्कादायक बाब म्हणजे या दरम्यान आरोपी आजूबाजूला पाहत होता, पण पूलमध्ये पोहणाऱ्या इतर लोकांचे याकडे लक्ष गेले नाही आणि कोणाकडूनही मदत मिळू शकली नाही.
हे ही वाचा : पोटच्या मुलांचा विचारही केला नाही, आईने प्रियकरासोबत मिळून सगळंच संपवलं
का केली हत्या?
या प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी आणि स्विमिंग पूलच्या मालकाने महत्त्वाचे खुलासे केले आहेत. सोहिलच्या कुटुंबियांनी सांगितले की, "आमचा मुलगा स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेला होता, तिथे त्याला जबरदस्तीने बुडवून मारण्यात आले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर आम्ही त्याला डॉक्टरांकडे नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले; आता आम्हाला या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई हवी आहे." तर स्विमिंग पूलचा मालक सालिम याने सांगितले की, "दुसऱ्या एका मुलाने उडी मारली तेव्हा मृतदेह त्याच्या पायाला लागला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता स्पष्ट झाले की, सोहिलला दुसऱ्या एका मुलाने पाण्यात दाबून मारले आहे. मृत तरुणाचे त्या मुलासोबत गावात आधी काही भांडण झाले होते, फुटेज पाहता हा स्पष्टपणे खून वाटत आहे."
हे ही वाचा : माझा बॉयफ्रेंडही आपल्यासोबत राहणार, बायकोने ठेवली अट; पुढे काय घडलं?
पोलिसांनी काय सांगितले?
दरम्यान, हा स्विमिंग पूल बेकायदेशीरपणे सुरू असल्याचेही समोर आले असून पोलीस आता या प्रकरणाच्या चौकशीत गुंतले आहेत. घटनेची माहिती मिळताच नखासा पोलीस ठाण्याचे पथक मृताच्या घरी पोहोचले आणि त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. या संवेदनशील प्रकरणाबाबत नखासा पोलीस ठाण्याचे प्रभारी उमेश सोलंकी यांनी सांगितले की, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली जात आहे. अद्याप कुटुंबियांकडून कारवाईसाठी कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नाही, तक्रार प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT











