Uttarpradesh Honour Killing : उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमधून ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाचे मृतदेह गावापासून जवळच असलेल्या एका जंगलात एकत्रित सापडल्याने खळबळ उडाली. ही हत्या तरुणीच्या भावांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अरमान आणि काजल अशी हत्या झालेल्यांची नावं असून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शेजारी राहणाऱ्या पुरुषाकडून विवाहितेचा विनयभंग; पतीने विरोध केल्यानंतर थेट डोळाच फोडला अन्...
नेमकं प्रकरण काय आहे?
काजल आणि अरमान या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. तीन दिवसांपूर्वी हे दोघेही बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी पाकबारा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या दोघांची शोधाशोध सुरु असतानाच गावाजवळील नीम करोली मंदिराच्या मागील जंगलात या दोघांचे मृतदेह एकत्रित सापडले. यानंतर गावात एकच खळबळ उडाली. काही काळ गावाला पोलिस छावणीचे रुप आले होते. या तणावामुळे गावात पीएसी दल तैनात करण्यात आले. याविषयी गावप्रमुख बबलू सैनी यांनी सांगितले की, 'काजल आणि अरमान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर काही तासांतच त्यांचे मृतदेह सापडले.'
तरुणीच्या भावांनीच हत्या केल्याचा संशय
मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपासाची चक्रं फिरवली. दुसऱ्या समुदायातील तरुणावर प्रेम केल्याचा राग तरुणीच्या भावांना होता. यातूनच त्यांनी ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. याविषयी एसपी सतपाल अंतिल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, हा मृत्यू सामान्य नसून पूर्वनियोजित खून आहे. सुरुवातीच्या तपासांनतर ही हत्या तरुणीच्या भावांनीच केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तीन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहांचे पोस्ट मार्टम करण्यात आले आहे.
हे ही वाचा : मुंबईचं महापौर पद कोणासाठी राखीव? राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर
ऑनर किलिंग म्हणजे काय?
जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने (प्रामुख्याने महिलांनी) स्वतःच्या मर्जीने विवाह केल्यामुळे किंवा प्रेमसंबंध ठेवल्यामुळे कुटुंबाच्या 'इज्जतीला' किंवा 'प्रतिष्ठेला' धक्का लागला आहे असे मानले जाते, तेव्हा स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांकडून त्या व्यक्तीची हत्या केली जाते. त्याला 'ऑनर किलिंग' म्हणतात.
ADVERTISEMENT











