Pune: नाना पेठेत गँगवार, बदला घेण्यासाठी आरोपीच्या मुलालाच केलं ठार.. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे हादरलं

Pune Gangwar Govind Komkar Murder: वनराज आंदेकर यांच्या खुनाने पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील अंतर्गत संघर्ष आणि कौटुंबिक वाद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

violent gangwar broke out in pune nana peth on eve of ganesh immersion govind komkar murder son of ganesh komkar vanraj andekar murder case

पुण्यातील नाना पेठेत हत्या

ओमकार वाबळे

• 09:43 PM • 05 Sep 2025

follow google news

Pune Gangwar Govind Komkar Murder: पुणे: पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेल्या टोळी युद्धाने आज (5 सप्टेंबर) पुन्हा एकदा अवघ्या पुण्याला हादरवून टाकलं आहे. गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येलाच भर रस्त्यात टोळी युद्धातून एकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वीच घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत संध्याकाळच्या वेळेस बरीच रहदारी असताना ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी तीन गोळ्या झाडल्या ज्यामध्ये गोविंद कोमकर याचा जागीच मृत्यू झाला. मृत गोविंद कोमकर हा कुख्यात गुंड गणेश कोमकरचा मुलगा असल्याचे समजतं आहे. गणेश कोमकर हा वर्षभरापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता. नुकतंच वनराज आंदेकरांच्या हत्येचा घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना त्याचा बदला म्हणून गोविंद कोमकरची हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा>> पुण्यातला 'मुळशी पॅटर्न' कसा आहे?, पुणेकरांना हादरवून टाकणारा गँगवॉरचा रक्तरंजित इतिहास!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक हा गणेश कोमकर होता. त्यामुळे आता त्याच्याच मुलाची हत्या करून आंदेकर खुनाचा बदला घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, या घटनेमुळे पुण्यातील टोळी युद्धाचा भडका पुन्हा एकदा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वनराज आंदेकर खून प्रकरण

पुण्यातील नाना पेठेतील डोके तालीम परिसरात 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर यांच्यावर 14 ते 15 हल्लेखोरांनी अत्यंत निर्घृण हल्ला केला होता. या हल्ल्यात गोळीबार आणि कोयत्याने वार करून आंदेकरांना संपवण्यात आलं होतं. प्राथमिक तपासात या खुनामागे कौटुंबिक वाद, संपत्तीवरील तंटे आणि टोळी युद्धाचा संबंध असल्याचे समोर आलेले. या प्रकरणात पोलिसांनी एकून २१ जणांना अटक केली होती.

या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारांमध्ये सोमनाथ गायकवाड, वनराज यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश कोमकर, जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, गणेश आणि जयंत कोमकर हे वनराज यांचे मेहुणे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

गोविंद कोमकरवर हल्ल्याचा कट

वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच एक कट रचला होता. कात्रज परिसरात रविवारी (1 सप्टेंबर 2025) मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखला गेलेला. पण याबाबत वेळीच माहिती मिळाल्याने पुणे पोलिसांना तो कट उधळून लावला होता. मात्र, असं असताना आज भर रस्त्यात गोविंद कोमकरची हत्या करण्यात आल्याने पुणे पोलिसांचे देखील धाबे दणाणले आहेत.

हे ही वाचा>> Vanraj Andekar: 'पोरं बोलावून तुला ठोकतेच', बहीण फक्त बोलली नाही... 24 तासातच भावाचा केला गेम!

टोळी युद्धाची पार्श्वभूमी

पुण्यातील टोळी युद्धाची मुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. 1980 च्या दशकात प्रमोद माळवदकर यांनी बाळू अडिकर याचा खून केल्यानंतर पुण्यात टोळी युद्धाला सुरुवात झालेली. त्यानंतर आंदेकर टोळीने नाना पेठेत आपला दबदबा निर्माण केला. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याला 1985 पासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. यामध्ये हत्या, खंडणी आणि शस्त्र बाळगणे यांचा समावेश आहे. बंडू आंदेकर याचा मुलगा वनराज याने राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता आणि 2017 साली तो राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आला होता. मात्र, त्याच्या कुटुंबाचा गुन्हेगारी विश्वातील प्रभाव कायम होता.

सोमनाथ गायकवाड आणि आंदेकर टोळी यांच्यातील वैर 2023 मध्ये तीव्र झाले, जेव्हा आंदेकर टोळीने शुभम दहिभाते आणि निखील आखाडे यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात निखील आखाडेचा मृत्यू झालेला. ज्यामुळे गायकवाड टोळीने बदला घेण्याचा निर्धार केला. याच वैरातून वनराज आंदेकर यांच्या खुनाचा कट रचला गेला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

कौटुंबिक वाद आणि संपत्तीचा तंटा

वनराज आंदेकर यांच्या खुनामागे कौटुंबिक वाद आणि संपत्तीचा तंटा हे देखील एक प्रमुख कारण आहे. नाना पेठेतील एक दुकान गणेश कोमकर यांना देण्यात आले होते, परंतु ते महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत पाडण्यात आलेले. यामुळे कोमकर आणि आंदेकर यांच्यातील संबंध ताणले गेले. याशिवाय, वनराज यांनी एका भांडणात मध्यस्थी केल्याने कोमकर यांच्या मनात राग होता. या सर्व कारणांमुळे गणेश आणि जयंत कोमकर यांनी सोमनाथ गायकवाडच्या साथीने वनराज यांच्या खुनाचा कट रचला होता. ज्यानंतर वनराज आंदेकरांना एकटं गाठून त्यांची हत्या करण्यात आली होती.

पोलिसांची कारवाई आणि सध्याची परिस्थिती

पुणे पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत 21 आरोपींना अटक केली होती. यामध्ये सोमनाथ गायकवाड, संजीवनी कोमकर, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांचा समावेश होता. या प्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, आरोपींना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे. याशिवाय, वनराज यांच्यासोबत हल्ल्यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या चुलत भावाला (शिवम आंदेकर) पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पण असं असतानाही आज ज्या पद्धतीने गोविंद कोमकरची हत्या करण्यात आली ते पाहता पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत सामान्य पुणेकर आता सवाल उपस्थित करत आहेत.

दरम्यान, टोळी युद्धामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी शहरात आता कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

पुण्यातील टोळीयुद्धाने डोकेदुखी वाढवली

पुण्यातील टोळी युद्धाची ही घटना शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रतिमेला डाग लावणारी आहे. माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी यापूर्वी सांगितले होते की, टोळ्यांमध्ये पैशांवरून आणि वर्चस्वासाठी सतत संघर्ष सुरू असतो. तरुण पिढी या गुंडांना आदर्श मानून त्यांच्याकडे आकर्षित होत आहे, ज्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर आणि आता गोविंद कोमकरवरील हल्ल्याच्या कटामुळे पुण्यातील टोळी युद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

    follow whatsapp