एका तरुणाने आपल्याच मावस भावाच्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घय हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाला आहे. उत्तर प्रदेशातील झाशीतील प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी महेंद्र नावाच्या तरुणाने मावस भावाची पत्नी असलेल्या माया हिच्यावर चाकूने हल्ला केला. महेंद्रने मायाच्या पोटात, छातीत, गळ्यावर आणि तोंडावर चाकूने अनेक वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की माया रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यानंतर आरोपी महेंद्रने रक्ताने माखलेले कपडे घटनास्थळीच सोडून दिले आणि विवस्त्र अवस्थेत तेथून पळ काढला. पोलिसांच्या भीतीने त्याने पोलीस ठाण्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर असलेल्या एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दुसरीकडे, गंभीर जखमी अवस्थेत मायाला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे ती जीवन-मरणाची लढाई लढत होती, मात्र आज उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा : पालघरमध्ये मोठी दुर्घटना, विषारी वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट; 2600 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन
लेकीला वाचवण्यासाठी मातेची धडपड
मृताच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी तो कामावर गेला होता. माया घरात पापड तळत होती आणि त्यांची चिमुरडी मुलगी जवळच खेळत होती. त्याच वेळी नराधम महेंद्र तिथे पोहोचला आणि त्याने मायावर हल्ला करण्यास सुरुवात केली. रक्ताने माखलेल्या अवस्थेतही मायाने आपल्या लेकीला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता मुलीला तिथून पळून जाण्याचा इशारा केला. पतीने सांगितले की, "जर मुलगी तिथून पळाली नसती, तर त्या नराधमाने तिलाही संपवले असते."
विश्वासाचा क्रूर अंत
पीडित पती अत्यंत हताश झाला असून त्याने आपल्याच भावावर संताप व्यक्त केला आहे. "ज्या भावावर मी प्राणापलीकडे विश्वास ठेवला, त्यानेच माझे घर उद्ध्वस्त केले," अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो महेंद्रला स्वतःसोबत अहमदाबादला घेऊन गेला होता, त्याची कपड्यांपासून जेवणापर्यंतची सोय केली होती. मात्र, तीन महिन्यांपूर्वी झाशीला परतल्यानंतर हा असा भयंकर प्रकार घडेल याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे प्रेमसंबंध होते. महेंद्रने ज्या मावस भावाने आश्रय दिला, त्याच्याच पत्नीसोबत अफेअर सुरु केले होते.
प्रेमनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी तुलसीराम पांडे यांनी सांगितले की, जखमी महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीने आधीच आत्महत्या केल्यामुळे पोलीस आता या प्रकरणातील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पालघरमध्ये मोठी दुर्घटना, विषारी वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट; 2600 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन
ADVERTISEMENT











