Crime News : एखाद्या सिनेमासारखी वाटावी अशी घटना समोर आलीये. दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेताना पोलिसांच्या हाती अत्यंत हृदयद्रावक माहिती लागली आहे. ज्या प्रियकरासोबत ही मुलगी घर सोडून पळाली होती, त्यानेच तिचा विश्वासघात केला आणि त्यानंतर सुरू झालेला तिचा संघर्षाचा प्रवास मृत्यूने संपला. पोलिसांनी जेव्हा तिच्या शेवटच्या पत्त्यावर धाव घेतली, तेव्हा काही दिवसांपूर्वीच बाळंतपणादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दोन वर्षे सतत शोध घेणाऱ्या पोलिसांच्या हाती जिवंत मुलीऐवजी केवळ तिच्या मृत्यूची बातमी लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पालघरमध्ये मोठी दुर्घटना, विषारी वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट; 2600 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन
प्रेयसीला मित्राच्या हवाली केले
घटनेची पार्श्वभूमी अशी की, 2 डिसेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशातील प्रेमनगरमध्ये राहणारी ही मुलगी शेजारी राहणाऱ्या रामफेर नावाच्या तरुणासोबत घरातून पळून गेली होती. रामफेरने तिला मोबाईल दिला होता आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाला वडिलांनी विरोध केल्यामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही मध्य प्रदेशातील इंदोरला पोहोचले खरे, पण तिथे पोहोचल्यावर रामफेरचा खरा चेहरा समोर आला. त्याने स्वतः लग्न करण्याऐवजी त्या मुलीला आपला मित्र खेमचंद उर्फ खेमू याच्या हवाली केले. खेमचंदनेही तिच्याशी लग्न न करता अनेक महिने तिला सोबत ठेवले, मात्र काही महिन्यांपूर्वीच आजारपणामुळे खेमचंदचा मृत्यू झाला.
प्रसुतीनंतर शेवट
खेमचंदच्या मृत्यूनंतर ही मुलगी इंदोरमध्ये पूर्णपणे एकटी पडली. उदरनिर्वाहासाठी तिने प्लास्टिकचे जग बनवणाऱ्या एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तिथेच तिची ओळख राजकुमार नावाच्या तरुणाशी झाली. राजकुमारने तिला आपल्या गावी नेले आणि मंदिरात तिच्याशी लग्न केले. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला, मात्र दुर्दैवाने प्रसूतीनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे तिचा जीव गेला. पोलीस तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियतीने तिचा शेवट केला होता.
हे ही वाचा : अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, इराणचे जोरदार प्रत्युत्तर; सौदी अरेबियातील अमेरिकेन दूतावासदेखील जळाले
पोलिसांना कशी मिळाली माहिती?
दुसरीकडे, प्रेमनगर पोलीस गेल्या दोन वर्षांपासून या मुलीचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध घेत होते. गेल्या महिन्यात तिचा पहिला प्रियकर रामफेर पुन्हा झाशीत परतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस इंदोरला पोहोचले आणि तिथे राजकुमारचा पत्ता लागला. पोलिसांनी सांगितले की, राजकुमारला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. प्रेमाचा खोटा बनाव करून मुलीची विक्री करणाऱ्या आणि तिला या मृत्यूपर्यंत निव्वळ दु:ख देणाऱ्या आरोपीच्या या कृत्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











