Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आघाडी निर्णायक आघाडीवर असताना, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. “मुंबई आकर उद्धव ठाकरे जी तथा राज ठाकरे जी से मिलूँगा” असे ट्वीट करत दुबे यांनी थेट ठाकरे बंधूंना भेटण्याबाबत भाष्य केलंय.
ADVERTISEMENT
विशेष म्हणजे, हे ट्वीट अशा वेळी आले आहे की, मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे पिछाडीवर असल्याचे चित्र समोर येत आहे. तर दुसरीकडे भाजप स्पष्ट विजयाच्या वाटेवर असल्याचे कल दिसत आहेत. त्यामुळे निशिकांत दुबे यांच्या ट्वीटचा राजकीय अर्थ काय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा : BMC Election Results 2026: मुंबईतील प्रत्येक वॉर्डचा नेमका निकाल, पाहा आता तुमचा नवा नगरसेवक कोण
निशिकांत दुबे हे यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. काही काळापूर्वी त्यांनी ‘मराठी माणूस’ आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर केलेल्या विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वक्तव्यांवरून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद गेल्या काही वर्षांपासून वेळोवेळी चर्चेत राहिला आहे. निशिकांत दुबे यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत केलेल्या काही वक्तव्यांमुळे हा वाद उफाळून आला होता. त्यांच्या विधानांना महाराष्ट्रात तीव्र विरोध झाला होता. निशिकांत दुबे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वावर आणि विशेषतः ठाकरे कुटुंबावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी डुबो डुबो के मारेंगे असं प्रत्युत्तरही दिलं होतं.
या पार्श्वभूमीवर आता त्यांनी ठाकरे बंधूंना भेटण्याची इच्छा जाहीर केल्याने, त्यांच्या भूमिकेतील बदल की राजकीय टोला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, हा ट्वीट उपहासात्मक किंवा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठीचा डाव असू शकतो. तर काहींच्या मते, भाजपच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंना उद्देशून दिलेला हा एक प्रकारचा राजकीय संदेश आहे.
दरम्यान, शिवसेना आणि मनसेकडून या ट्वीटवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर मात्र या ट्वीटवरून जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांनी यावर टीका करत दुबे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून दिली आहे, तर काहींनी याला राजकीय शिष्टाचाराचा भाग मानले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











