'... काय चुकलं, काय राहून गेलं', मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची भावुक पोस्ट

मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणूकीत मुंबई ठाकरे बंधुंच्या हातातून निसटली आणि भाजपची सत्ता आली. या निकालानंतर, राज ठाकरे यांनी X प्लॅटफॉर्मवरून ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:47 AM • 17 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची भावुक पोस्ट

point

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

Raj Thackeray on bmc election results: मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महापालिकांचा काल (16 जानेवारी) निकाल जाहीर झाला. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची (अखंडीत) सत्ता होती. यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र यावेळी मुंबई ठाकरे बंधुंच्या हातातून निसटली आणि भाजपची सत्ता आली. या निकालानंतर, राज ठाकरे यांनी X प्लॅटफॉर्मवरून ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी 

"सस्नेह जय महाराष्ट्र, 

सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे.  ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. 

बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. 

तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. 

लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! ! "

    follow whatsapp