Eknath Shinde on Mumbai Mayor : महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यातील नागरिकांनी भाजपच्या पदरात घवघवीत यश टाकले. सर्वात रंगतदार झाली ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या चुरशीच्या लढाईत भाजप महायुतीने ठाकरे बंधूंना धोबीपछाड देत मुंबई महानगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेत महापौर भाजपचा होणार की शिवसेना शिंदे गटाचा याविषयी चर्चा रंगली आहे. ठाण्यात महायुतीने 100 हून अधिक जागा जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका येशील आनंद आश्रमातून मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापौरपदाविषयी भाष्य केले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : '... काय चुकलं, काय राहून गेलं', मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची भावुक पोस्ट
महापौर कुणाचा? काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महायुतीच्या घवघवीत यशानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईच्या महापौरपदाविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, मुंबईत महापौरपद किंवा सत्तेऐवजी आम्हाला बदल घडवायचा आहे. मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. मुंबईत महापौर महायुतीचाच होईल. मुंबईत 25 वर्षे कारभार केला. मात्र त्यांच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना-भाजपला बहुमत मिळाल्याचे शिंदेंनी सांगितले.
ठाकरेंवर साधला निशाणा
राज्यभरात महायुतीच्या बाजूने वातावरण असून आम्ही विकासाचा अजेंडा राबवला असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.ते म्हणाले, काहीजणांनी ही निवडणूक भावनेच्या मुद्द्यावर लढवली. मात्र मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले असून विकासाला नाकारणाऱ्यांना मुंबईकरांनी नाकारले आहे. विकास हाच ब्रँड आम्ही स्वीकारला आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुंबई शहर जागतिक दर्जाचे झाले पाहिजे असे म्हटले आहे. त्या दिशेनं प्रयत्न सुरु असल्याचंही शिंदे म्हणाले.
हे ही वाचा : भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर जीवघेणा हल्ला! महापालिका निकालानंतर दोन्ही गटांत राडा...
एमआयएमचे उमेदवार निवडून येणे चिंताजनक
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणूकीत एमआयएमचे नाणे खणखणीत वाजले आहे. याविषयी एकनाथ शिंदेंनी चिंता व्यक्त केली. समाजाविरोधात, समाजविघातक बोलत असणारे लोक निवडून येणे ही चिंतेची बाब असल्याचं शिंदेंनी सांगतिलं.
ADVERTISEMENT











