Aamir Khan on Sonam Wangchuk : दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक सध्या उपोषणावर बसले आहेत. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या समर्थनार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या 20 दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एकही घास घेतलेला नसल्याचे सांगितले जात असून त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आंदोलनाची आणि आरोग्याची चर्चा देशभर सुरू असून अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : तुम्ही विचारही करू शकत नाही एवढं विचित्र राजकारण, NCP च्या विचित्र संघर्षाची भन्नाट Inside Story
'3 इडियट्स'मधील 'रँचो' वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा
गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड कलाकारांनीही सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आंदोलनापेक्षा त्यांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर '3 इडियट्स' चित्रपटात चतुरची भूमिका साकारणारे अभिनेता होमी वैद्य यांचा एक व्हिडिओही समोर आला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपण 'रँचो' म्हणजेच सोनम वांगचुक यांना अशा अवस्थेत पाहू इच्छित नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा '3 इडियट्स'मधील रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा रंगू लागली.
हेही वाचा : IAS मुंढे इफेक्ट! गुटखा कसा बनतो? चालू फॅक्टरीवर धाड, आरोपी पसार अन्..VIDEO
आमिर खानने सोनम वांगचुक यांच्याबाबत मांडली भूमिका
दरम्यान, अभिनेता आमिर खान यांनी या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी '3 इडियट्स'मधील रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. चित्रपटाची निर्मिती सुरू असताना आपण सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहितीही नव्हती, असे आमिर खान म्हणाले. त्यांनी होमी वैद्य यांचा व्हिडिओ पाहिल्याचे सांगत, तो त्यांचा वैयक्तिक समज असू शकतो, मात्र दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक अभिजात जोशी किंवा स्वतः त्यांना त्या काळात सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमिर खान यांनी पुढे सांगितले की, सोनम वांगचुक करत असलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी '3 इडियट्स'मधील पात्र त्यांच्यावर आधारित असणे आवश्यक नाही. स्वतः सोनम वांगचुक यांनीही यापूर्वी हे पात्र त्यांच्यावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे आमिर यांनी नमूद केले. तसेच, सध्या सर्वांनाच सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची आणि त्यांच्या आयुष्याची चिंता वाटत असल्याचे सांगत, त्यांनी लवकरात लवकर उपोषण समाप्त करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा आमिर खान यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT












