मुंबई : अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली हिने तिच्या ऑस्ट्रियन पती पीटर हाग यांच्या विरोधात गंभीर आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घरगुती हिंसाचार, शारीरिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा दावा करत सेलिनाने न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी केली. विवाहानंतर पतीकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून ऑस्ट्रियाहून भारतात परतण्याशिवाय पर्याय उरला नव्हता, असेही तिने न्यायालयात स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
ही याचिका दंडाधिकारी एस. सी. तायडे यांच्या समोर सुनावणीसाठी आली. प्रारंभीची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तिच्या पती पीटर हाग यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 12 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. सेलिना आणि पीटर यांचा विवाह 2010 मध्ये झाला असून दाम्पत्याला तीन मुलं आहेत. विवाहानंतर सेलिनाला काम करण्यावर पतीने निर्बंध घातले, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
हेही वाचा : अडीच एकरातील पीक हत्तींनी तुडवलं, वर्षभराच्या मेहनतीची राखरांगोळी; नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
सेलिनाचा आरोप आहे की, पीटरचा स्वभाव चटकन रागावणारा असून तो अनेकदा मद्यप्राशन करून तिला मारहाण करायचा. या दोन्ही कारणांमुळे तिच्यावर मानसिक ताण वाढत गेला आणि वैवाहिक जीवन असह्य बनले. पतीच्या स्वभावातील बदल, आक्रमक वर्तन आणि सततची हिंसक प्रवृत्ती यामुळे जीवन उद्ध्वस्त झाले, असे सेलिना सांगते.
याचिकेत सेलिनाने पतीविरोधात केलेल्या छळाच्या घटना आणि त्यांचे तपशीलवार वर्णन न्यायालयासमोर मांडले आहे. छळाच्या आरोपांसोबतच पतीकडून झालेल्या अन्यायाची भरपाई म्हणून तिने 50 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच विभक्त राहताना मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 10 लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशीही तिची मागणी आहे.
सध्या तीनही मुले ऑस्ट्रियामध्ये पतीसोबत राहत आहेत. त्यामुळे मुलांना भेटण्याचा हक्क मिळावा, त्यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठीही तिने न्यायालयाकडे विनंती केली आहे. स्वतःवर झालेले अन्यायकारक वर्तन, मुलांपासून दूर राहण्याची वेळ आणि वैवाहिक जीवनातील सततचे संघर्ष यामुळे न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक असल्याचे सेलिना ठामपणे सांगत आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिनेत्रीने केलेल्या गंभीर आरोपांमुळे हा खटला चांगलाच गाजत असून 12 डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे उत्सुकता निर्माण झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने दिली धडक, हादरवून टाकणारी अपघाताची घटना, रुग्णालयात दाखल
ADVERTISEMENT











