Allu Arjun Released : रात्रभर तुरुंगात राहिल्यानंतर अल्लू अर्जुनची आज (14 डिसेंबर) सकाळी 6.40 च्या सुमारास सुटका झाली. अल्लू अर्जुनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता अल्लू अरविंद आणि अभिनेत्याचे सासरे कंचरला चंद्रशेखर अल्लू अर्जुनला घेण्यासाठी हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पोहोचले होते. पुष्पा-2 च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला काल (13 डिसेंबर) अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Jitendra Awhad: "शरद पवारांमध्ये काही बदल..."; अजितदादा-शरद पवार भेटीवर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान
अल्लू अर्जुनला कालच या प्रकरणात जामीन मिळाला होता, मात्र त्यानंतरही त्याला तुरुंगातच रात्र काढावी लागली. अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटल्यानंतर आता त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय. अल्लू अर्जुनची सुटका झाल्यानंतर त्याचे वकील अशोक रेड्डी म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार अल्लू अर्जुनची कालच (13 डिसेंबर) सुटका व्हायला हवी होती. त्यांनी जे केलं ते योग्य नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने पुढे जाऊ.
हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील 'त्या' महिलांवर दाखल होणार गुन्हा! नेमकं कारण काय?
तयार होती क्लास-1 बॅरेक
जामीन आदेशाच्या प्रती ऑनलाइन अपलोड न केल्यामुळे अल्लू अर्जुनची सुटका होऊ शकली नाही, असं रात्री सांगण्यात आलं. तर अधिकाऱ्यांनी अल्लू अर्जूनला राहण्यासाठी वर्ग-1 ची बॅरेक तयार केली होती अशीही माहिती आहे. काल अल्लू अर्जुनला रात्री सोडण्यात येणार नसल्याची बातमी समोर आल्यावर त्याच्या चाहत्यांचा संताप दिसून आला. चंचलगुडा तुरुंगाबाहेर अनेक लोक जमले होते आणि त्यांनी निदर्शने सुरू केली होती.
का झाली होती अटक?
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरच्या सायंकाळी पुष्पा 2 चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अल्लू अर्जुन या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे अर्जुनच्या जबरा चाहत्यांनी थिएटरच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ही करावा लागला होता. या चाहत्यांना भेटण्यासाठी अल्लू अर्जुन त्या ठिकाणी पोहोचला होता. अभिनेत्याला पाहण्यासाठी लोक धावले आणि त्याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
लोकांच्या गर्दीत एक लहान मुलगा बेशुद्ध झाला होता आणि 35 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही महिला तिच्या कुटुंबासह पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली होती. या घटनेवर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली होती. अर्जुन म्हणाला, संध्या थिएटरमध्ये अशा प्रकारची घटना घडायला नको होती. मी संध्या थिएटरमध्ये गेलो होतो. मी पूर्ण चित्रपट पाहू शकलो नाही. कारण त्याचवेळी मला मॅनेजरने सांगितलं की, खूप गर्दी आहे, आपण इथून निघालो पाहिजे.
ADVERTISEMENT











