Dipali Sayyed and Radha Patil Marathi Big Boss Season 6 : बिग बॉस मराठीच्या 6 व्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक रीलस्टार यामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, या सिझनमधील स्पर्धक असलेली अभिनेत्री दिपाली सय्यद आणि नृत्यांगणा राधा पाटील यांच्यामध्ये सुरुवातीलाच वादावादी झालेली पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने दोघींमधील वादाचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये दिपाली सय्यद सध्याच्या लावणी करण्याच्या पद्धतीवर बोलताना पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे राधा पाटील दिपाली सय्यदने केलेल्या टिप्पणीमुळे भावुक झालीये. तिने दिपालीला जोरदार प्रत्युत्तरही दिलंय. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
दोघींमध्ये नेमका काय संवाद झाला?
"लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतो आपण... त्याला तुम्ही चीप करुन टाकलंय. बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता", ही टिप्पणी अभिनेत्री दिपाली सय्यदने बिग बॉसच्या घरात केली. त्यानंतर नृत्यांगणा राधा पाटील भावुक झाली आणि आक्रमकपणे बोलतानाही पाहायला मिळाली. दिपालीला प्रत्युत्तर राधा पाटीलने देखील इशारा दिला. "दिपाली ताई मला लावणीवरुन मला बोलत आहेत. मी पण लायकी काढू शकते", असं राधा पाटील म्हणाली.
बिग बॉस मराठी सीझन 6 चे दणक्यात आगमन झाले असून 11 जानेवारी 2026 रोजी कलर्स मराठी वाहिनीवर या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर पार पडला. यंदाचा सीझन प्रेक्षकांसाठी अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या खास ‘लय भारी’ शैलीत पुन्हा एकदा सूत्रसंचालन करत असून त्यांच्या विनोदी आणि रोखठोक संवादामुळे पहिल्याच दिवसापासून शोला चांगलीच उंची मिळाली आहे. हा शो दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होत असून JioHotstar वरही कधीही पाहता येणार आहे. यंदा एकूण 17 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला असून प्रत्येक जण आपली वेगळी ओळख आणि खेळाची पद्धत घेऊन मैदानात उतरलेला आहे.
सीझन 6 मध्ये मनोरंजन, राजकारण आणि सोशल मीडिया विश्वातील विविध क्षेत्रांतील चेहरे पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री व राजकारणी दीपाली सय्यद, अभिनेता राकेश बापट, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर करण सोनावणे (Focused Indian), अभिनेत्री सोनाली राऊत आणि ‘खान्देश किंग’ म्हणून ओळखला जाणारा सचीन कुमावत यांचा सहभाग चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यात पहिल्याच दिवशी झालेल्या वादामुळे घरातील वातावरण तापले, तर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणारी इन्फ्लूएन्सर दिव्या शिंदे वेगळ्या मुद्द्यांमुळे लक्ष वेधून घेत आहे. या सर्व स्पर्धकांमुळे यंदाचा बिग बॉस मराठी सीझन 6 संघर्ष, भावना आणि मनोरंजनाने भरलेला ठरणार, यात शंका नाही.
हेही वाचा : आंतरजातीय प्रेमविवाह, 8 महिन्यांचा मुलगा... पण शेवटी वडिलांनीच मुलीचा संसार केला उद्धवस्त! नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT











