आदित्य ठाकरेंची कट्टर समर्थक आणि युवा सेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झालं. ठाकरे गटाच्या ठाण्यातील मोर्चात चालत असताना दुर्गा भोसले-शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना रुग्णायलयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दुर्गा भोसले-शिंदेंच्या निधनानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आल्याच्या विरोधात जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. याच मोर्चात आदित्य ठाकरेंसोबत 30 वर्षीय युवा सेना सचिव दुर्गा भोसले-शिंदेही सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा >> ‘बावन’ आणे, कमळबाई आणि शिंदेंचे शाप; शिवसेनेचा (UBT) भाजपवर घणाघात
मोर्चात कार्यकर्त्यांसोबत घोषणा देत त्या चालत होत्या. मोर्चात चालत असताना दुर्गा यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दुर्गा भोसले यांची युवासेनेच्या कर्तृत्ववान पदाधिकारी अशी ओळख होती. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला शोक
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “दुर्गाजी, यांच्या जाण्याची बातमी ऐकून अतिव दुःख झाले. एक मेहनती, दयाळू युवा सैनिक आम्ही गमावली आहे. युवासेनेचं हे दुःख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. ओम शांती”, असं आदित्य ठाकरेंनी शोक व्यक्त केला आहे.
दुर्गा भोसले-शिंदे यांची माहिती…
दुर्गा भोसले या पेशाने वकील होत्या. सुरुवातीपासूनच कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेमध्ये त्या सुरुवातीपासून काम करत होत्या. संघटनेबद्दल त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर युवा सेनेच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
युवा सेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी त्यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये देखील आदित्य ठाकरे एकनिष्ठ असं लिहिलेलं आहे. रोशनी शिंदे यांच्या प्रकरणात देखील त्यांनी आवाज उठवा होता. देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत त्यांनी ट्विट देखील केले होते. 4 एप्रिलला केलेलं हे ट्विट हे त्यांचं अखेरचं ट्विट ठरलं.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरण : दुर्गा भोसले शिंदेंनी शेवटच्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं?
ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणावरून दुर्गा भोसले-शिंदे यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती.
“गतिमान सरकार की सत्तेच्या धुंदीत सुसाट? ठाणे येथे युवा सेनेची युवती पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना बेदम मारण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा! एका युवतीला घोळक्याने जाऊन मारहाण करणे हेच नपुंसकत्वाचे लक्षण”, अशी टीका त्यांनी केली होती.
ADVERTISEMENT
