जळगावच्या आबा महाजनांना साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार

मुंबई तक

• 03:26 PM • 12 Mar 2021

बालसाहित्यात गेल्या काही वर्षांपासून महत्वाची भूमिका बजावून लिखाण करणारे तरुण लेखक आबा गोविंदा महाजन यांना साहित्य अकादमीचा मानाचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर केला आहे. आबा महाजन हे सध्या महसूल विभागात तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. सध्या नोकरीच्या निमीत्ताने धुळ्यातील शिरपूर येथे असलेले आबा महाजन हे जळगावच्या एरंडोलचे रहिवासी आहे. आबा महाजन यांच्या रुपाने खान्देशातील लेखकाला पहिल्यांदाच […]

Mumbaitak
follow google news

बालसाहित्यात गेल्या काही वर्षांपासून महत्वाची भूमिका बजावून लिखाण करणारे तरुण लेखक आबा गोविंदा महाजन यांना साहित्य अकादमीचा मानाचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर केला आहे. आबा महाजन हे सध्या महसूल विभागात तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. सध्या नोकरीच्या निमीत्ताने धुळ्यातील शिरपूर येथे असलेले आबा महाजन हे जळगावच्या एरंडोलचे रहिवासी आहे. आबा महाजन यांच्या रुपाने खान्देशातील लेखकाला पहिल्यांदाच साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

हे वाचलं का?

साहित्य अकादमीच्या वतीने आज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाला ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला. ५० हजार रुपये रोख आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य विश्वात हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. आज सायंकाळी साहित्य अकादमीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाजन यांनाही पुरस्कार जाहीर झाला. ही बातमी कळताच आबा महाजन यांच्यावर त्यांच्या हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

आबा महाजन यांचा ‘आबाची गोष्ट’ हा लघुकथा संग्रह २०१७ मध्ये प्रकाशित झाला. आबा महाजन हे नव्या पिढीतील प्रयोगशील बालसाहित्यिक मानले जातात. आत्तापर्यंत १३ बाल कवितासंग्रह, २ बालकुमार कथासंग्रह, २ बालकुमार कादंबरी, बालनाट्य, मुलांसाठी ललित लेखन, अशी साहित्यसंपदा महाजन यांच्या नावावर आहे. याआधी महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कथा व कवितांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना ३ मानाचे पुरस्कार देखील यापूर्वी जाहीर झाले आहेत. याशिवाय विविध संस्थांच्या वतीने त्यांना साहित्यासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

साहित्य अकादमीच्या वतीने प्रतिष्ठेचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आबा महाजन यांनी हा पुरस्कार आपल्या बालमित्रांना तसेच खानदेशातील बोलीला समर्पित केला आहे. गेल्या ३० वर्षांपासून आपल्या बालसाहित्याच्या साधनेची दखल साहित्य अकादमीने घेतली, याचा मनस्वी आनंद असल्याची भावना महाजन यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp