धर्मवीर हा सिनेमा १३ मे २०२२ ला महाराष्ट्रात रिलिज झाला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडला. महाराष्ट्रभरात या सिनेमाची चर्चा झाली. हा सिनेमा धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर यातली मध्यवर्ती भूमिका म्हणजेच आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे. नुकताच हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात आला. त्यानंतर प्रसाद ओकने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रसाद ओकने धर्मवीर सिनेमाबाबत केलेली पोस्ट?
थिएटर्स मध्ये गाजला
OTT वर वाजला
आणि काल झी मराठी वर
तुमच्या प्रेमामुळे सजला
#धर्मवीर
पुन्हा एकदा इतके मेसेजेस आणि कॉल्स आलेत कालपासून, अभिनंदनाचे आणि कौतुकाचे कि असं वाटलं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांनाच एकदा SALUTE करावा….!!!!
असंच प्रेम कायम राहू द्या…!!!
ही पोस्ट प्रसाद ओकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केली आहे. तसंच या पोस्टसोबत दोन फोटोही पोस्ट केले आहेत.
धर्मवीर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सव्वा महिन्यात राज्यात राजकीय बंड
प्रसाद ओकने या सिनेमात केलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. हा सिनेमा झी5 या ओटीटी अॅपवरही मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला. धर्मवीर सिनेमा मे महिन्यात आला आणि या सिनेमानंतर सव्वा महिन्यातच राज्यात बंड झालं. त्यामुळे हा सिनेमा त्या बंडाची सुरूवात करणारा ठरला अशीही चर्चा रंगली.
‘धर्मवीर’ चित्रपटात राज ठाकरे आणि नारायण राणे यांना दाखवण्यात आले आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या अखेरच्या काळात हे दोन्ही नेते त्यांच्या संपर्कात होते; मात्र या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंवर नाराज होते. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीदरम्यान महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत एकनाथ शिंदेंना सहभागी करून न घेण्यामागेही हेच कारण असल्याची चर्चा आहे. आणि इथूनच त्यांच्यातील संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली अशी चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे. मागच्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
धर्मवीर सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चेत
धर्मवीर या सिनेमाची सोशल मीडियावर चर्चाही चांगलीच झाली. तसंच सिनेमा हिटही झाला. आता हा सिनेमाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडण्यास कारण ठरला अशीही चर्चा होते आहे.
धर्मवीर या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे. तर क्षितिज दाते या अभिनेत्याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. प्रवीण तरडे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रसाद ओक आणि प्रवीण तरडे यांच्यासह एकनाथ शिंदेही अनेक कार्यक्रमांमध्ये गेले होते. आता हा सिनेमाच ठाकरे-शिंदे वादाचं मूळ ठरला आहे असं बोललं जातं आहे.
ADVERTISEMENT
