Subodh Bhave : “भाषणाच्या चुकीच्या बातमीने गोंधळ घातला…याची जबाबदारी”

मुंबई तक

• 12:23 PM • 02 Aug 2022

मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या भाषणासंदर्भात आता स्वतःसुबोध भावे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. भाषणाच्या चुकीच्या बातमीने गोंधळ घातला असं सुबोध भावे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे असंही सुबोध भावे यांनी म्हटलं आहे. सुबोध भावे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हे स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हटलं आहे […]

Mumbaitak
follow google news

मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या भाषणासंदर्भात आता स्वतःसुबोध भावे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. भाषणाच्या चुकीच्या बातमीने गोंधळ घातला असं सुबोध भावे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे असंही सुबोध भावे यांनी म्हटलं आहे. सुबोध भावे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हे स्पष्टीकरण दिलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे सुबोध भावे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये?

काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ.

(कुठेही कट न करता जसाच्या तसा) आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे.

पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची.

माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो.

पण त्या आधी एकदा “संपूर्ण भाषण” त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.

आपला,

सुबोध भावे

जय हिंद!

जय महाराष्ट्र! असं म्हणत सुबोध भावे यांनी आपल्या भाषणाविषयीची भूमिका मांडली आहे.

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं . या कार्यक्रमात सुबोध भावे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं . डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्याचवेळी सुबोध भावे यांनी भाषणात हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे अभिनेते सुबोध भावे यांनी?

आपण सध्या उत्तम शिक्षण घेतो आणि करिअरच्या मागे लागतो. चांगली नोकरी कशी मिळेल. विदेशात जाऊन चांगली नोकरी कशी मिळेल हा प्रयत्न करत असतो. अशा विचारांमुले लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचं काम दिलं आहे. देश निर्मितीसाठी पुढच्या पिढीमध्ये शिक्षणाचा पाया रूजवावा लागेल. राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते काय करतील हे चित्र आपल्यासमोर आहे.

पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजं रोवून त्यांना देशाच्या चांगल्या उभारणीसाठी उभं करणं गरजेचं आहे. इंग्रजांनी जी शिक्षणपद्धती आपल्या देशात राबवली ती चांगले नोकरदार तयार व्हावेत म्हणून चांगले मालक तयार व्हावेत म्हणून नाही. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. त्यामुळेच काल परवा कडे वक्तव्य झालं तशी वक्तव्य होतात. मुंबई, महाराष्ट्रातून लोक निघून गेले तर पैसेच राहणार नाहीत असं वक्तव्य करायला नेते धजावतात असं म्हणत राज्यपालांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. आपल्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला, त्या अर्थाने बोललोच नव्हतो असं आता सुबोध भावे यांनी स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp